नवी दिल्ली :- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज, 7 मार्च 2024 रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय संस्कृत विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत समारंभात उपस्थित राहून तेथील सर्वांना संबोधित केले.
याप्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की भारतीय संस्कृतीप्रती अभिमानाची भावना बाळगणे हा आपल्या राष्ट्रीय जाणीवेचा पाया आहे. आपल्या देशाची समृद्ध संस्कृती समजून घेताना आपल्यामध्ये अभिमानाची भावना जागृत होते. आपल्या संस्कृतीचा वारसा संस्कृत भाषेत जतन करून ठेवण्यात आला आहे.म्हणून, संस्कृत भाषेत उपलब्ध असलेल्या सांस्कृतिक जागरूकतेचा प्रसार करणे म्हणजे देशसेवाच आहे असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रपती म्हणाल्या की संस्कृत भाषेने आपल्या विस्तृत भूमीतील वैविध्य एका सूत्रात बांधून ठेवले आहे. संस्कृतमधील शब्द संग्रहाने अनेक भारतीय भाषा सशक्त झाल्या आहेत आणि या भाषांची देशाच्या विविध राज्यांमध्ये तसेच भागांमध्ये भरभराट होत आहे. ही केवळ देवांची भाषा नसून सामान्य जनतेची देखील भाषा आहे असे त्यांनी सांगितले.
गार्गी, मैत्रेयी,अपला आणि लोपामुद्रा यांसारख्या विद्वान महिलांनी ज्या भाषेमध्ये अजरामर योगदान दिले आहे , त्या संस्कृत भाषेत महिलांचा अधिकाधिक सहभाग असायला हवा अशी अपेक्षा राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केली. आजच्या दीक्षांत समारंभात सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांमध्ये मुलगे आणि मुलींची संख्या जवळजवळ समान असल्याचे दिसून आल्यावर त्यांनी आनंद व्यक्त केला.
राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, संस्कृत भाषेत अध्यात्म आणि नैतिकता यांच्यावर आधारित असंख्य उत्कृष्ट लेख उपलब्ध आहेत.प्राचीन काळात आचार्यांनी लोकांना दिलेले ज्ञान अगदी आजच्या काळात देखील समर्पक ठरताना दिसते आणि तसे ते नेहमीच असेल असे त्या म्हणाल्या. विद्यार्थ्यांनी खरे बोलण्याचा, नैतिकतेने आचरण करण्याचा, स्वयं-अध्ययनाबाबत निष्काळजी न राहण्याचा, कोणत्याही कर्तव्यापासून दूर न पळण्याचा निश्चय केला पाहिजे आणि पवित्र कार्यांबाबत जागरूक असले पाहिजे असे राष्ट्रपतींनी सांगितले. असे वागल्याने विद्यार्थी त्यांच्या प्रतिभेला न्याय देऊ शकतील आणि त्यांची कर्तव्ये पाळण्यात यशस्वी होतील.