नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवाचे पाचवे पर्व नागपूर शहरात सुरू आहे. या महोत्वांतर्गत शहरात विविध स्पर्धा सुरू असून बुधवारी 18 जानेवारी 2023 रोजी पंजा कुस्ती (आर्म रेसलिंग) स्पर्धेला सुरूवात होत आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री तथा प्रो-पंजा लीगच्या संचालक प्रीती झांगियानी आणि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता, मॉडेल, निर्माता दिग्दर्शक तथा प्रो-पंजा लीगचे संचालक परवीन डबास यांच्या विशेष उपस्थितीत सायंकाळी 5 वाजता रेशीमबाग मैदानात स्पर्धेचे उद्घाटन होईल.
पंजा कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी आमदार मोहन मते, खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी यांची उपस्थिती असेल.
शहरातील विविध भागातून स्पर्धेत सहभागी होणा-या खेळाडूंसाठी प्रो-पंजा लीगच्या संचालकांची पंजा कुस्ती स्पर्धेसाठी असणारी उपस्थिती ही खेळाडूंसाठी पर्वणी ठरणार आहे. देशातील पहिल्या प्रोफेशनल प्रो-पंजा लीगचे संचालक प्रीती झांगियानी आणि परवनी डबास यांच्या उपस्थितीत होणा-या पंजा कुस्ती स्पर्धेसाठी शहरातील खेळाडू उत्सूक आहेत. पंजा कुस्ती स्पर्धेला व्यावसायीक स्वरूप प्रदान करून खेळाडूंना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्य अभिनेत्री प्रीती झांगियानी आणि अभिनेता परवीन डबास यांनी केले आहे.
खासदार क्रीडा महोत्वाच्या माध्यमातून नागपूर शहरातील खेळाडूंना एक महत्वाचे व्यासपीठ मिळाले असून या माध्यमातून अनेक खेळाडूंनी देशाचे प्रतिनिधित्व करीत शहराचे नावलौकीक केले आहे. पंजा कुस्ती स्पर्धेच्या माध्यमातून भविष्यात नागपूर शहरातील खेळाडू सुद्धा देशात नागपूर शहराचा ठसा उमटवितील. शहरातील क्रीडाप्रेमींनी या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला मोठ्या संख्येत उपस्थित रहावे, असे आवाहन खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.
पंजा कुस्ती स्पर्धेच्या आयोजनासाठी कन्वेनर सचिन माथने, समन्वयक गुड्डू गुप्ता, अरूण कपूरे, प्रमोद वालमांडरे, श्रीकांत वरणकर आदी सहकार्य करीत आहेत.