मान्सूनपूर्व कामे महावितरणकडून वेगात सुरू

नागपूर :- मागिल काही दिवसांपासून सुरु असलेल्या उनाच्या तडाक्यासोबतच अधून-मधून येणारा अवकाळी पाऊस व त्यानंतरच लगेचच सुरु होणारा पावसाळा वीज ग्राहकांना सुसह्य व्हावा यासाठी महावितरणने विविध ठिकाणी मान्सुमपुर्व देखभाल व दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेतली आहेत. नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात सर्वत्र वीज वाहिन्यांच्या आड येणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्यासह इतरही अनेक कामे वेगाने सुरू आहेत.

कडक उन्हाच्या झळा झेलत महावितरणचे कर्मचारी देखभाल व दुरुस्तीच्या कामात गुंतले आहेत. साधारणत: मे महिन्यात नागपूरसह संपूर्ण विदर्भात अंगाची लाही-लाही करणारे तापमान असते, त्यातच अधूनमधून विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडण्याच्या घटनाही या काळात होत असतात. महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेतील बहुतांश सामग्री ही उघड्यावर असल्याने वातावरणात होणा-या बदलाचा प्रतिकुल परिणाम वीज वितरण यंत्रणेवर होत असतो व पर्यायाने त्याचा परिणाम ग्राहक आणि ग्राहक सेवांवर होतो. यामुळे ऊन्हाळा व त्यानंतर लगेच सुरु होणारा पावसाळा हा वीज ग्राहकांना सुसह्य व्हावा यासाठी महावितरण कामाला लागली आहे.

वाढलेल्या झाडांच्या फांद्या तारांवर लोंबकळत असतात, या फ़ांद्या काही ठिकाणी तारांवर घासत असतात व यामुळे विद्युत यंत्रणेची क्षती होत असते, ही हानी टाळण्याकरिता नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील सर्व संबंधितांनी आपापल्या भागातील यंत्रणेची या दॄष्टीने चाचपणी करून गरजेनुसार संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मदतीने या फांद्या तोडण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. वीज तारांमध्ये अडकलेले पतंग, मांजा, पताका, तोरण, फ़्लेक्स बॅनर्स, प्लास्टिक झेंडे याचाही फटका यंत्रणेला बसत असतो, यामुळे वीजपुरवठा खंडीत होतो. वीज वाहिन्यांत अडकलेले पतंग, मांजा, कपडयांचे तुकडे किंवा तत्सम काहीही तारांवर असेल तर ते वेळीच काढून टाकण्याच्या सुचनाही करण्यात आल्या आहेत.

सैल झालेले गार्डींग व स्पॅन घट्ट करणे, दोन खांबांमधील झोल पडलेल्या तारा ओढून घेणे, सर्व खांब आणि त्यांचे ताण सुस्थितीत करण्याचे कामही मोठया प्रमाणात हाती घेण्यात आले आहे. वीज उपकेंद्रातील रोहीत्रांमधील तेलाची योग्य पातळी राखणे तसेच ब्रिदरमधील सिलीका जेल पिंगट झाले असल्यास ते बदलण्यात येत आहे. वीजवितरण यंत्रणेत अर्थिंगचे महत्व अधिक आहे, याकरिता रोहीत्रांचे अर्थिंग मजबूत करणे, पोल, वितरण पेट्या, फिडर पिलर्स, मिनी फिडर पिलर या सर्वांचे अर्थिंग सुस्थितीत करण्याचे कामही मोठया प्रमाणात सुरू करण्यात येत आहे.

याशिवाय वीज खांब आणि तारांचे मजबुतीकरण, वीजेचे खांब, तारा बदलणे किंवा झोल काढणे, जुन्या फिडर पिलरमध्ये इन्शुलेशन स्प्रे मारणे तसेच पावसाचे पाणी साचणाऱ्या परिसरातील फिडर पिलरची उंची वाढवणे, रोहित्रांचे अर्थिंग तपासणे, ऑइल फिल्टरेशन, उपकेंद्रातील ब्रेकरची दुरुस्ती, बॅटरी चार्जिंग, फ्यूज बदलणे अशी विविध कामे सर्वत्र मोठ्या प्रमाणात सुरु आहेत.

नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन

वाढत्या तापमानामूळे ग्राहकांना विजेअभावी होणाऱ्या त्रासाची महावितरणला जाणीव आहे. देखभाल दुरुस्तीची कामे वीज यंत्रणेच्या हिताची तसेच अखंडित, सुरळीत व सुरक्षित ग्राहक सेवेसाठी आहे. वीज ग्राहकांनी या काळात थोडासा संयम राखून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडियातर्फे गुणवंत आरीकरांना पदोन्नती

Fri May 17 , 2024
नागपूर :- भ्रष्टाचारा विरुद्ध जनजागृती करणारे गुणवंत आरीकर यांना अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडियाचे जिल्हा संचालक, नागपूर (महाराष्ट्र) म्हणून पदोन्नती मिळाली आहे. गुणवंत आरीकर हे समाजसेवक असून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कोषाध्यक्ष आहेत. त्यांनी आपल्या आयुष्यात विविध उपक्रमाद्वारे समाजात जनजागृती करून अनेकांना मदतीचा हात दिला आहे. आपल्या पदाच्या प्रतिष्ठेत राहून आपण संस्थेची उद्दिष्टे लोकांपर्यंत पोहोचवाल अशी आशा आहे. संस्थेच्या प्रकल्पांद्वारे भ्रष्टाचार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com