सर्वसामान्य स्त्रीच्या आयुष्याची गडद शोकात्म कथा प्रेक्षकांच्या प्रत्ययाला मांडण्याचा प्रमोद भुसारी यांचा प्रयत्न यशस्वी – वसंत आबाजी डहाके

– प्रमोद भुसारी यांच्या “भोवरा” पुस्तकाचे प्रकाशन थाटात संपन्न

नागपूर :- जीएंच्या कथेवर प्रमोद भुसारी यांचे ‘भोवरा’ हे नाटक आधारित असून नाटकात पात्रांचे संवाद, स्थिती किंवा प्रसंग असतात, पात्रे आंगिक अभिनयातून मानसिक स्थिती व्यक्त करतात. कथेचे नाटकात रूपांतर होते तेव्हा कथेतल्या पात्रांचे बोलणे नाटकात घेतले जाऊ शकते. कथेच्या निवेदनाचा भाग काही संवादातून तर काही हावभावातून दाखवला जाऊ शकतो. कथा वाचायची असते, नाटक पाहायचे असते. संपूर्ण कथा मुख्यत: निवेदनातून रचली जाते, आवश्यक तेथे पात्रांचे बोलणे असते. नाटकात दृश्ये आणि पात्रांचे संवाद हे दोन घटक महत्त्वाचे असतात असे त्यांनी प्रतिपादन केले. ते विदर्भ साहित्य संघाच्या प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या अमेय दालन येथे आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलत होते.

जीएंच्या भोवरा या कथेचे आणि प्रमोद भुसारी यांनी लिहिलेल्या भोवरा नाटकाची त्यांनी तूलनात्मक उत्तम मांडणी केली. कथा हा स्वतंत्र साहित्यप्रकार आहे तर नाटक हा स्वतंत्र कलाप्रकार आहे. नाटक या कलाप्रकाराचा रूपबंध कथेच्या रूपबंधाहून निराळा असतो. कथेत प्रसंग मागे, पुढे येऊ शकतात, वर्तमानातून भूतकाळात, पुन्हा वर्तमानकाळात जाता येते. नाटकात सतत दृश्यमान असा वर्तमानकाळ असतो. भूतकाळातली दृश्येही काहीएक क्लृप्ती वापरून दाखवली जाऊ शकतात. तरीही वर्तमानकाळाचा धागा सोडता येत नाही. 

सुप्रसिद्ध लेखक जी.ए.कुळकर्णी यांच्या जन्मशताब्दी सांगता समारोहाच्या निमित्ताने त्यांच्या काजळमाया या संग्रहातील “भोवरा” या विलक्षण कथेवर सेवानिवृत्त निवासी उपजिल्हाधिकारी आणि ज्येष्ठ रंगकर्मी प्रमोद भुसारी लिखित “भोवरा” या दोन अंकी नाटकाच्या पुस्तकाचे प्रकाशन सुप्रसिद्ध साहित्यिक महेश एलकुंचवार यांच्या हस्ते झाले. विदर्भ साहित्य संघ, विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि विजय प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रकाशन समारंभाचे आयोजन करण्यात आले.

लेखक प्रमोद भुसारी यांनी पुस्तक लेखनामागची भूमिका विषद करताना सांगितले की, शिक्षण घेत असताना, जीएंच्या कथा अस्वस्थ करीत होत्या.

‘भोवरा’ या कथेवर पुस्तकरूपात नाटक लिहितांना जीएंच्या मान्यतेला कुठेही धक्का लागू न देता,कथानकाशी इमान राखून माझ्यातल्या नाट्यकलेच्या जाणिवेतून झालेल्या आकलनाने कथेचा बाज कुठेही ढळू न देता, नाट्यतंत्राचा आधार घेऊन, वाचकांसमोर रंगारंगांचा ‘भोवरा’ फिरवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. जीएंच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं हे नाटक प्रकाशित व्हावं म्हणून माझे मित्र विजय प्रकाशनचे सचिन उपाध्याय यांनी पुढाकार घेतला. डॉ. सुचित्रानं प्रोत्साहन दिलं आणि नंदाताई पैठणकर, पुणे यांनी शब्दांचा आधार दिला.

डॉ. रवींद्र शोभणे यांनी सांगितले की, प्रमोद भुसारी यांनी फार पूर्वी लिहून सादर केलेल्या या नाटकाचे परिक्षण करताना लेखन आणि दिग्दर्शनासह सर्वाधिक ९ पारितोषिकांनी ‘भोवरा’ या नाटकास गौरविले असल्याचे सांगून, लेखकाने जीएंशी ईमान राखून केवळ उल्लेखावरून कूठेही भिन्न वाटणार नाही असे प्रसंग उभारून यशस्वी लेखन केले असल्याचे गोरवोद्गार काढले.

महेश एलकुंचवार यांनी कथा आणि नाटक या साहित्यातल्या भिन्न बाबी असल्याचे प्रतिपादन करून भोवरा या नाटकाचे कथेचा बाज कुठेही ढळू न देता अतिशय संयत आणि प्रभावी लेखन केल्याचे सांगत लेखकाचे अभिनंदन केले.

याप्रसंगी गिरीश गांधी म्हणाले की, प्रमोद एक हरहुन्नरी कलावंत आहे. नाट्यतंत्राचा वापर करीत एक उत्कृष्ट अशी कलाकृती समोर आणून नाट्यक्षेत्रास त्याने अर्पित केली आहे. या नाटकांत डॅा. जोगळेकरांची भुमिका करतांना मला संहितेच्या जास्त जवळ जाता आलं.

तेव्हा लक्षात आलं की जीएंच्या कथेवर आधारित हे नाटक लिहीण्याचं आव्हान लेखक म्हणून लिलया पेललं आहे.

अध्यक्षस्थानाहून प्रदीप दाते यांनी सांगितले की,लेखक एक उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी आहे,तितकाच उत्कृष्ट अभिनेता व दिग्दर्शकसुद्धा आहे. हे नाटक बघणाऱ्याला आणि वाचणाऱ्याला सुद्धा एक वेगळी अनूभूती देणारे ठरेल. सुप्रसिद्ध चित्रकार नाना मिसाळ यांनी या नाटकावरील भाष्यावर उत्फूर्त चित्र रेखाटून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

कार्यक्रमाला प्रामुख्याने निवृत्त न्यायमूर्ती विकास शिरपूरकर, संजय काकडे अतिरिक्त आयुक्त ,अजित दिवाडकर, विनोद कुळकर्णी, अरविंद पाठक, गजानन सगदेव, नानु नेवरे, लोकनाथ यशवंत, किरण काशिनाथ, माजी मंत्री डॉ.नितीन राऊत तसेच कला,साहित्य, नाट्य रसिक आणि वाचकप्रेमी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे सूत्र संचालन आणि आभार प्रदर्शन वृषाली देशपांडे यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

घरफोडी करणाऱ्या, हद्दपार आरोपीस अटक

Mon Jul 10 , 2023
नागपूर :- गुन्हे शाखा युनिट क्र.०३ अधिकारी व अंमलदार यांनी पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या खात्रीशिर माहीतीवरून पोलीस ठाणे शांतीनगर हद्दीत कावरापेठ, रेल्वे लाईन जवळ, सापळा रचुन आरोपी अब्दुल रहमान उर्फ रम्मू वल्द अब्दुल रज्जाक वय ३० वर्ष रा. मुदलीयार ले आउट, शांतीनगर, नागपूर यास घातक लोखंडी चाकुसह ताब्यात घेवून आरोपीचा अभिलेख तपासला असता आरोपी हा पोलीस उप आयुक्त परिक यांचे आदेशाने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!