– वसुलीसाठी वरिष्ठ अधिकारी सरसावले
नागपूर :- वारंवार आवाहन करूनही वीजबिलांचा भरणा न करणाऱ्या ग्राहकांवर महावितरणने कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. ग्राहकांकडील थकबाकी वसुलीसाठी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्यासह सर्व वरिष्ठ अभियंते व अधिकारी यांच्यासह कर्मचारी देखील ग्राहकांकडे जाऊन थकबाकी भरण्याचे आवाहन करीत आहेत.
आर्थिक वर्ष संपण्यासाठी केवळ 40 दिवस शिल्लक राहिल्याने महावितरणने थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या मोहिमेला गती दिली असून, एका महिन्याचे बिल थकीत असले तरी वीजपुरवठा खंडित करण्याची कार्यवाही महावितरणने सुरू केली आहे. थकबाकीचा आलेख सातत्याने उंचावत असल्याने महावितरणने आता कठोर उपाययोजना आखल्या आहेत. कोणताही मुलाहिजा न ठेवता थकबाकीदारांची वीज जोडणी खंडित केली जात असल्याने थकबाकीदारांनी वीजबिल वेळेत भरून कारवाई टाळावी, असे आवाहनही महावितरणकडून करण्यात आले आहे.
जिल्ह्यात 67 कोटींची थकबाकी
नागपूर जिल्ह्यातील कृषी वगळता अन्य वर्गवारीतील थकबाकीदार ग्राहकांची संख्या 85 हजार इतकी असून, त्यांच्याकडे वीजबिलापोटी तब्यल 67 कोटी रुपये इतकी थकबाकी आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणकडून थकीत रक्कम किती आहे हे न पाहता थकबाकी असल्यास नियमाप्रमाणे वीजपुरवठा खंडित केला असून 1 फेब्रुवारीपासून सुमारे 2 हजार 800 पेक्षा अधिक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून दिवसेंदिवस ही मोहीम अधिक तीव्रतेने राबविल्या जाणार आहे.
घरबसल्या भरा वीजबिल
वीजग्राहकांना केव्हाही व कुठूनही ऑनलाईनद्वारे थकीत व चालू वीजबिल www. mahadiscom.in या संकेतस्थळावर अथवा महावितरणच्या मोबाइल अॅपवर भरता येते. पाच हजारांपेक्षा अधिक बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे वीजबिल भरण्याची सुविधा उपलब्ध आहे शिवाय ऑनलाइन वीजबिल भरल्यास भरघोस सूट मिळत असल्याने ग्राहकांनी वेळेत बिल जमा करण्याचे आवाहन देखील महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.
..तर संबंधितांवर विद्युत कायद्यांतर्गत कारवाई
ज्या थकबाकीदारांची वीज खंडित करण्यात आली आहे, अशा थकबाकीदारांच्या वीजजोडण्यांची स्वतंत्र पथकाद्वारे तपासणी केली जात आहे. थकबाकीदार शेजाऱ्याकडून अथवा इतर ठिकाणाहून वायर किंवा केबलद्वारे विजेचा वापर करत असल्याचे निदर्शनास आल्यास शेजारी व संबंधित थकबाकीदारावर भारतीय विद्युत कायदा 2003 च्या कलम 135 / 138 नुसार कठोर कारवाई केली जात आहे.
वाढत्या थकबाकीमुळे वसुली मोहिमेला वेग देण्यात आला आहे. थकबाकीदारांचा केवळ वीजपुरवठा खंडित करणे, हा महावितरणचा उद्देश नाही. परंतु, वारंवार आवाहन किंवा विनंती करूनही जे थकबाकीदार थकीत वीजबिलांची रक्कम भरण्यास दाद देत नाहीत, त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे वीजग्राहकांनी चालू व थकीत बिलांचा त्वरित भरणा करुन सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी केले आहे.