जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये 3 मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदलातचे आयोजन

यवतमाळ :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालय तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालये, कामगार न्यायालय, औद्योगिक न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, ग्राहक तकार निवारण मंच आणि इतर सर्व न्यायालय तसेच न्यायाधिकरणे येथे 3 मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आलेले आहे.

राष्ट्रीय व राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष नागेश न्हावकर यांच्या मार्गदर्शनाखाली या लोकअदालतचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेले तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, भुअर्जन मामल्याची प्रकरणे, महसुली प्रकरणे, वैवाहिक संबंधातील वाद प्रकरणे, बँका व अन्य वित्तीय संस्थांचे नुकसान व वसुली प्रकरणे व तडजोडीस पात्र असणारी सर्व प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली निघणार आहे.

या लोकअदालतीमध्ये वाद मिटविण्याकरीता न्यायाधीश, तज्ज्ञ वकील व सामाजिक कार्यकर्ते यांचे मंडळ पक्षकारांस मदत करेल. या अदालतीमध्ये प्रकरण ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही व लोकअदालतीचे निवाड्याविरूध्द अपील नसल्याने वाद कायमचा मिटतो. न्यायालयाच्या हुकुमनाम्याप्रमाणे लोकअदालतीमध्ये होणाऱ्या निवाड्याची अंमलबजावणी न्यायालयामार्फत करता येते. खटल्यांमध्ये साक्षी पुरावा, उलट तपासणी, दिर्घ युक्तीवाद याबाबी टाळल्या जातात. याप्रमाणे लोकअदालतीमध्ये वाद मिटविल्याने वेळेची व पैशाची बचत होते. तसेच प्रकरण न्यायालयात चालविण्यासाठी होणाऱ्या त्रासातून सुटका होते व त्वरित आपसी संमतीने न्याय मिळतो.

पक्षकारांनी आपली प्रकरणे दि.3 मार्च रोजी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ठेवण्याकरीता प्रलंबित प्रकरणांसाठी संबंधित न्यायालयात अर्ज सादर करावा आणि दाखलपूर्व प्रकरणांसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच जिल्ह्यातील इतर तालुका विधी सेवा समितीच्या कार्यालयाशी संपर्क साधून जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून आपसी तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष नागेश न्हावकर आणि जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष संजय जैन यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पालकांनी मुलांच्या शिक्षणाविषयी जागरूक असावे - अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल

Thu Feb 22 , 2024
– शाळा व्यवस्थापन समिती व पालक मेळावा नागपूर :- मुलांच्या सर्वांगिण विकासाचे केंद्र शाळा आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच इतर क्षेत्राचेही ज्ञान देउन त्यांचा विकास साधण्याचा प्रयत्न होतो. या मौलीक कार्यात पालकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी पालकांनी मुलांच्या शिक्षणाविषयी जागरूक रहावे, असे आवाहन मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी केले. नागपूर महानगरपालिका शिक्षण विभागाच्या नवचेतना उपक्रमाअंतर्गत बुधवारी (ता.२१) रेशीमबाग […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com