- सकाळी 10 ते 1 या कालावधीत अर्ज स्वीकारणार
- सेतू केंद्रामध्ये तक्रार नोंदवून टोकन प्राप्त करा
- महानगर व जिल्ह्यातील समस्यावरही निर्णय
- 35 विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार
नागपूर : नागपूर महानगर व जिल्ह्यातील जनतेच्या प्रशासनासंदर्भातील प्रलंबित विषयांना निकाली काढण्यासाठी राज्याचे ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी लोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन केले असून उद्या पहिला लोकसंवाद कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11.00 वाजता होणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रशासनासंदर्भातील तक्रारी, आक्षेप, गाऱ्हाणी मांडण्यासाठी लिखित अर्जासह उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सामान्य जनता व प्रशासन यातील अंतर कमी होण्यासाठी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली उद्या शनिवारी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे पहिल्या लोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी आर. विमला यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांना आयोजनाबाबत माहिती दिली. तत्पूर्वी त्यांनी सकाळी 11 वाजता विभाग प्रमुखांची बैठक घेऊन उद्याचा कार्यक्रमाचा आढावा घेतला.
दि. 14 मे रोजी सकाळी 11 ते 1 या कालावधीत येणाऱ्या सर्व समस्यांनाही समाविष्ट करण्याचा प्रशासन प्रयत्न करत आहे. त्यासाठी उद्या शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालय बचत भवन येथे टोकन पद्धतीने तक्रार कर्त्याला प्रवेश देण्यात येणार आहे. जवळपास 35 विभागाचे अधिकारी, कर्मचारी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी तैनात असतील.
सकाळी 10.00 वाजतापासून आपल्या तक्रारी देता येणार आहे. मात्र तक्रारी देण्याची वेळ सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 पर्यंत आहे. सुरुवातीला सेतू केंद्रामध्ये अर्ज दाखल करण्यात यावा. त्यानंतर टोकन देऊन प्रत्येक तक्रारकर्त्याचा तक्रारीवर विचार केला जाईल. याबाबतचा निर्णय पालकमंत्र्यांसमोर घेतला जाणार आहे. त्यामुळे कोणतीही समस्या असो, अगदी महानगरपालिकेपासून तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आणि नगरपंचायत पासून जिल्हा परिषदपर्यंत या लोकसंवाद कार्यक्रमात जनतेला थेट पालकमंत्र्यांशी संवाद साधता येणार आहे. जिल्हास्तरीय वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नागरीकांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे.
नागरिकांनी या संधीचा फायदा घ्यावा, लोकशाहीमध्ये असलेल्या अधिकाराचा वापर करावा व आपले प्रश्न या व्यासपीठावर सोडून घ्यावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.
उद्या सर्व जिल्हा प्रशासन या उपक्रमासाठी उपस्थित राहणार असून तक्रारकर्त्याच्या समस्या जागेवरच सोडविल्या जाव्यात असा प्रयत्न करणार आहे. टप्प्याटप्प्याने हा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. काही नागरिकांनी आजच वेगवेगळ्या विषयांवर अर्ज दिले आहेत. उद्या मोठ्या प्रमाणात नागरीक या लोकसंवादाचा लाभ घेतील अशी प्रशासनाला आशा आहे.