– फुटाळा तलाव येथे 12 ते 14 ऑक्टोबर दरम्यान आयोजन
नागपूर :- महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) मार्फत आयोजित नागपूर जल पर्यटन महोत्सव अर्थात नागपूर अॅक्वा फेस्ट १२ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन फुटाळा तलाव येथे शनिवार, १२ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली तसेच पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव जयश्री भोज, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा अॅक्वा फेस्ट होत आहे.
नागपूर अॅक्वा फेस्ट – २०२४ हा महाराष्ट्रातील जल पर्यटनाला, पर्यटन क्षेत्राला भरारी देणारा व साहसी अनुभव देणारा उत्कृष्ट उपक्रम आहे. यात जलक्रीडा प्रकारातील बोटींगची अनुभूती नागपूरकरांना घेता येणार आहे. पर्यटनाविषयी जागृती निर्माण करणे, मनोरंजन, साहसी क्रीडाविषयक आवड निर्माण करणे, जलसंपत्तीचे जतन, संवर्धन आणि सुरक्षिततेचे महत्त्व पटवून देण्याचा या महोत्सवाचा उद्देश आहे.
जल पर्यटनाची प्रमुख आकर्षणेः
बोट सफारी, जेट स्की राईड्स, सेलिंग बोट, कयाकिंग, फ्लाइंग फिश राईड, बनाना राईड, बंपर राईड, वॉटर झोबिंग, इलेक्ट्रिक शिकारा, स्कूबा डायविंग,
नागपुरकरांसाठी जल पर्यटनाची संधी
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे जल पर्यटनामध्ये महाराष्ट्राला अग्रणी बनवण्याचे उद्दिष्ट ठेवून काम करत आहे. या महोत्सवात जलक्रीडांचा थरारक अनुभव घेता येईल.