काँग्रेसची ‘अर्धवट’ चारसोबिसी !

महात्मा गांधींच्या काही धोरणांबद्दल अनेकांचे हजार मतभेद असले तरी, एक गोष्ट मान्य केली पाहिजे की, गांधीजी असेतोवर काँग्रेस पक्षात बऱ्यापैकी सच्चाई आणि लोकाभिमुखता होती. स्वातंत्र्योत्तर काळात नेहरूंच्या कालावधीत ही सच्चाई कमी कमी होत गेली आणि इंदिराजींच्या काळात सच्चेपणा जाऊन खोटेपणा, लाळघोटेपणा वाढीस लागला. (Indira is India असं निर्लज्जपणे म्हणणारे देवकांत बरूआ पक्षाध्यक्ष झाले. ) पुढे पक्षाचं नेतृत्व सोनिया गांधींच्या हाती आल़्यापासून तर सच्चाईचा कडेलोट होऊन खोटारडेपणा, लबाडी वाढीस लागून काँग्रेस लोकांपासून तुटू लागली. आता या पक्षाचे नेते राजकीय स्वार्थासाठी लोकांची फसवणूक करण्याचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर सादर करताना दिसतात !!

सध्याचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खडगेंचेच पाहा. 28 डिसेंबर 2023 रोजी काँग्रेसच्या 138 व्या वर्धापन दिनानिमित्त नागपुरात झालेल्या “है तैयार हम” रॅलीत हे महाशय पंतप्रधान नरेन्द्र मोदींच्या संदर्भात धादांत खोटं बोलले. आपल्या भाषणात त्यांनी उपस्थितांना विचारलं- “मोदी प्रत्येकाला 15 लाख रुपये देतो म्हणाले. तुम्हाला मिळाले का ?” मोदी असं कधी म्हणाले, याचा तपशील देण्याची तसदी मात्र त्यांनी घेतली नाही. देतील कसे ? मोदी असं काही बोललेच नाही. 2014 च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान कांकेरच्या (छत्तीसगड) भाषणात मोदी एवढंच म्हणाले- “भारतीय जनतेला लुटून नेत्यांनी परदेशी बॅंकांमध्ये जमा केलेले काळे धन देशात परत आणले गेले तर एकेका गरीब माणसाला 15-20 लाख रुपये सहज मिळू शकतात आणि त्यातून गरिबांचा विकास केला जाऊ शकतो.” “प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करीन” असं मोदी चुकूनही म्हणाले नाही. पण, “खोटं बोल, पण रेटून बोल” या थाटात काँग्रेससह विरोधी पक्षांचे नेते सर्रास बोलत असतात. तोच खोटेपणा पक्षाध्यक्ष खडगेंनी नागपुरात केला.

भाजपाला आणि पंतप्रधानांसह इतरही नेत्यांना बदनाम करण्याच्या नादात या लोकांनी गेली दहा वर्षे अपप्रचाराचा धुराळा उडविलेला आहे. जाहीर सभा, पत्रपरिषदा, सोशल मीडिया यातून मोदींना सतत टार्गेट केलं जात असतं. इतकं करूनही 2014 आणि 2019 या दोन लोकसभा निवडणुकीत मोदीच पंतप्रधान झाले आणि आपल्या पक्षाचं लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद सुद्धा हिसकावलं गेलं (इतकी दुर्गती मतदारांनी केली) ही मूळ पोटदुखी आहे. त्याआधीची दहा वर्षे, 2004 ते 2014, सोनिया गांधींनी रिमोट कंट्रोलनं राज्य केलं, ते एकदमच हातातून निघून गेलं, हे याचं मुख्य कारण आहे. त्यातूनच हा खोटारडेपणा सुरू आहे.

वास्तविक, मोदींच्या मंत्रिमंडळातील सर्वात लोकप्रिय आणि विरोधकांनाही आवडणारे मंत्री आहेत नितीन गडकरी. खुद्द सोनिया गांधींनी त्यांना पत्र पाठवून त्यांच्या रायबरेली मतदारसंघातील रस्त्यांबद्दल आभार मानले होते. परंतु, हे विसरून, काँग्रेसनेते एवढे घायकुतीला आले की, त्यांनी परवा एक्स वर एक ट्विट करताना गडकरींचं विधान अशा पद्धतीनं पेश केलं की जणू काही ते मोदी सरकारविरुद्ध बोलत आहेत.

एक्स वरील काँग्रेसच्या अधिकृत हॅण्डलवरून एक पोस्ट टाकण्यात आली. ‘लल्लनटॉप’ नावाच्या न्यूज पोर्टल वरील ‘जमघट’ कार्यक्रमात गडकरींची पावणेदोन तासांची मुलाखत झाली. त्यातील फक्त 19 सेकंदांच्या व्हिडिओ क्लिपसह या पोस्टमध्ये लिहिलं आहे- “आज गांव, मजदूर, किसान दुखी है। गांवमे अच्छे रोड्स नही है, पीनेके लिए शुद्ध पानी नही है, अच्छे अस्पताल नही है, अच्छे स्कूल्स नही है- मोदी सरकारके मंत्री नितीन गडकरी”

पंतप्रधान नरेन्द्र मोदी आणि आपल्यात मतभेद असल्याचं दाखवून भाजपात आणि लोकांमध्ये गोंधळ माजवण्यासाठी काँग्रेसनं केलेली ही ‘काडी’ गडकरींच्या लक्षात येताच त्यांनी कॉंग्रेसाध्यक्ष खडगेंनी आणि सरचिटणीस जयराम रमेश यांना कायदेशीर नोटीस बजावून माफीची मागणी केली. त्यावर रमेश यांची मुजोरी पाहा- “जे ते बोलले, तेच आम्ही पोस्ट केलं आहे.” हा खोटारडेपणा आहे. विषय अर्धवट वापरण्याची चलाखी करून हे घडविण्यात आलं आहे. या मुलाखतीत वरील मुद्दा सव्वा मिनिटाचा (18 मिनिट 11 सेकंद ते 19 मिनिट 25 सेकंद पर्यंत) झाला. त्यातील आगापिछा सोडून फक्त 19 सेकंदांची मधलीच व्हिडिओ क्लिप ट्विटमध्ये वापरून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचं स्पष्टपणे दिसतं. सव्वा मिनिटांच्या व्हिडिओमधील तो मूळ भाग पुढीलप्रमाणे-

ग्रामीण विकासाच्या मुद्याचं महत्त्व सांगताना गडकरी म्हणाले- “जब गांधीजी थे तब 90 परसेंट आबादी गांवमें रहती थी। धीरे धीरे 30 परसेंटका मायग्रेशन क्यूं हुआ ? इसका कारण आज गांव, गरीब, किसान दुखी है। इसका कारण ये है कि जल, जमीन, जंगल और जानवर, रूरल, ॲग्रिकल्चर, ट्राइबल यह जो इकॉनॉमी है यहां अच्छे रोड नही है, अच्छे अस्पताल नही है, अच्छे स्कूल नही है, किसानके फसलको अच्छे भाव नही है। जो सस्टेनेबल डेवलपमेंट होनी है वो हुई है, हुई नही ऐसा नही। पर जिस प्रपोर्शनमे बाकी क्षेत्रोमें हुआ, उतना नही हुआ। हमारी सरकार आनेके बाद हमभी बहुत काम कर रहे है। हमने 550 ॲस्परेंट ब्लॉक्स निकाले है। 120 ॲस्परेंट डिस्ट्रिक्ट्स मोदीजीने निकाले है जहां विशेष रूपसे काम करे। तो यह जो परिस्थिती है, इसमे उपाय यही है जो मेरी फिलोसोफी है कि इस देशमे 16 लाख करोडका Fossil Fuel (पेट्रोल, डिझेल बनविणाऱ्या क्रूड ऑईलसह इतरही) इम्पोर्ट होता है। यह फ्युएलमेसे अगर 10 लाख करोड, 5 लाख करोडभी किसान अगर इथेनॉल तैयार करेगा, ग्रीन हायड्रोजन तैयार करेगा, तो हमारे देशका किसान सुखी, समृद्ध, संपन्न होगा। गांवमे रोजगार निर्माण होंगे।”

यातील 18 मिनिट 18 सेकंद ते 18 मिनिट 36 सेकंद या 19 सेकंदाच्या भागातील फक्त 5 वाक्यांचे जोडजंतर करून हे ट्विट तयार करण्यात आले आणि सरकारच्या कामाचा उल्लेख असलेला भाग वगळण्यात आला. मुद्दाम केलेली ही “अर्धवट कलाकारी” ही जनतेची फसवणूक नाही का ? गडकरींनी अभावांचा जो उल्लेख केला, तो जुन्या काळाशी संबंधित होता, हे मागच्यापुढच्या वाक्यांमधील संदर्भावरून पुरेसं स्पष्ट होतं. तरीही त्यांच्यात आणि मोदींमध्ये दरी निर्माण करण्यासाठी कॉंग्रेसनं खोटेपणाचा आसरा घ्यावा ? तरी बरं की, काँग्रेसच्या काळात काहीच विकास झाला नाही, असं इतरांसारखं गडकरी म्हणाले नाही. (“डेवलपमेंट हुई नही ऐसा नही”) परंतु, नीट विचार केला तर हेच लक्षात येतं की, कॉंग्रेसच्या प्रदीर्घ राजवटीत नेत्यांनी विकासाकडे फारसं लक्ष दिलं नाही. त्यामुळे तो कूर्मगतीनं झाला. अन्यथा, आज पाऊणशे वर्षानंतरही मोठा भूभाग आणि जनसमूह लाभांपासून वंचित राहिला नसता. अनेक विषय माघारले नसते. तसंच, विकासाचा वेग कितीतरी पटींनी आणि अंगांनी वाढविण्याची संधी मोदींना गेली दहा वर्षे मिळाली नसती. (हाच तो पोटशूळ !) सार्वजनिक बांधकाम नावाचं खातं असतं, त्याला मंत्री असतो, तो काम करतो, ते काम सर्वांना दिसून येतं हे महाराष्ट्राला आणि देशाला पहिल्यांदा दाखवून अन् भासवून देणाऱ्या नितीन गडकरींबद्दल, निव्वळ मोदी द्वेषापोटी असा खोटारडेपणा करताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही, कॉंग्रेसवाल्यांनो ! चुल्लुभर पानीमे डूबके मर जाओ, बेईमानों !!

– विनोद देशमुख

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सुधीरभाऊ हे दूरदृष्टी लाभलेले लोकप्रतिनिधी ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गौरवोद्गार

Fri Mar 15 , 2024
– बॉटनिकल गार्डनच्या लोकार्पण सोहळ्यात ना. मुनगंटीवार यांच्या कार्यशैलीचे कौतुक चंद्रपूर :- एखादे काम हाती घेतले की पूर्ण शक्ती पणाला लावून ते पूर्णत्वास नेणारे मंत्रीमंडळातील माझे वरीष्ठ सहयोगी सुधीरभाऊ हे दूरदृष्टी लाभलेले लोकप्रतिनिधी आहेत, या शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ना. सुधीर मुनगंटीवार यांचे कौतुक केले. चंद्रपूर येथील विसापूर बॉटनिकल गार्डनचे लोकार्पण, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com