नागपूर :- महावितरणच्या अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी केवळ तीन दिवस शिल्लक आहेत. या थकबाकीमुळे कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांना त्यांच्या मूळ थकबाकीवर 100 टक्के व्याज आणि विलंब शुल्कात माफी मिळत असून या योजनेची मुदत 31 मार्च 2025 रोजी संपत आहे. त्यामुळे या योजनेच्या लाभासाठी केवळ तीन दिवसांचा अवधी शिल्लक आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, वीजबिलांची थकबाकी असलेल्या जागेची मालकी बदलली तरी नवीन जागा मालकाला किंवा ताबेदारास थकबाकी भरावीच लागते. दोनवेळा मुदतवाढ मिळालेल्या या योजनेस पुन्हा मुदतवाढ न देण्याचा निर्णय महावितरणने घेतला असून थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या योजनेचा लाभ घेतल्यानंतर, ग्राहक योग्य पुरावे सादर करून त्याच पत्त्यावर, त्याच नावाने अथवा नवीन नावाने वीज जोडणी घेण्यास पात्र ठरतो.
थकबाकीदारांनी केवळ मूळ थकबाकीचा भरणा केल्यास 100 टक्के व्याज व विलंब आकार (दंड) माफ होत आहे. मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा केल्यास लघुदाब ग्राहकांना 10 टक्के तर उच्चदाब ग्राहकांना 5 टक्के अतिरिक्त सवलत मिळत आहे. यासोबतच सुरुवातीस मूळ थकबाकीच्या 30 टक्के रक्कम भरून उर्वरित 70 टक्के रक्कम व्याजमुक्त सहा हप्त्यांत भरण्याचीही सोय आहे. तसेच, लाभार्थी ग्राहकांना मागणीनुसार त्या जागेवर नव्याने जोडणी दिली जाणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी मोजकेच दिवस शिल्लक असून थकबाकीमुक्तीसाठी वीजग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी केले आहे.
या योजनेत सहभागी होण्यासाठी ग्राहकांनी महावितरणच्या www.mahadiscom.in/wss/wss या वेबसाइटवर किंवा महावितरणच्या मोबाईल ॲपद्वारे अर्ज करावा. याशिवाय अभय योजनेत सहभागी होण्यासाठी अधिक तपशील जाणून घेण्यासाठी 1912, 18002333435 किंवा 18002123435 या टोल फ्री क्रमांकावर अथवा महावितरणच्या स्थानिक कार्यालयात संपर्क साधावा.
विदर्भातील 40,418 ग्राहकांनी घेतला लाभ
महावितरणच्या नागपूर प्रादेशिक कार्यालय अंतर्गत असलेल्या विदर्भातील 40,418 ग्राहकांनी आतापर्यंत अभय योजनेचा लाभ घेत 43 कोटी 32 लाख 57 हजारांचा भरणा करून थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकारात माफी मिळवित थकबाकीतून मुक्तता मिळवली आहे. यात सर्वाधिक 10,499 ग्राहक नागपूर जिल्ह्यातील आहेत. त्याखालोखाल बुलढाणा जिल्ह्यातील 6,229, गडचिरोली जिल्ह्यातील 4,329 ग्राहकांचा समावेश आहे. याशिवाय वाशिम (3,139), अकोला (3,129), यवतमाळ (2,846), अमरावती (2,795), गोंदिया (2,265), चंद्रपूर (2,198), वर्धा (2,005) आणि भंडारा (954) या जिल्ह्यातील ग्राहकांचा समावेश आहे. त्यापैकी 18 हजार 283 ग्राहकांनी आहे त्या कनेक्शनच्या पुनर्जोडणीसाठी, तर 9 हजार 410 ग्राहकांनी नव्याने वीज जोडणी घेण्याची तयारी आहे.
कायदेशीर कारवाई:
प्रत्येक थकबाकीदार ग्राहकांची तपासणी करण्यात येऊन या योजनेत सहभागी न होता वीज वापरणाऱ्या ग्राहकांवर 1 एप्रिल 2025 नंतर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे. या योजनेत सहभागी होऊन देखील उर्वरित न भरलेल्या ग्राहकांचा वीज पुरवठा तात्काळ खंडित करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना सर्व संबंधितांना देण्यात आल्याचे महावितरणने कळविले असल्याने अशा ग्राहकांनी 31 मार्च 2025 पूर्वी उर्वरित रकमेचा भरणा करून या सुवर्णसंधीचा लाभ घेत चिंतामुक्त होण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.