नागपूर :- देशात पुढील वर्षी आयोजित होणाऱ्या जी-२० या राष्ट्रसमुहांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आयोजनात नागपूरचाही सहभाग राहणार असून आज विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत याबाबतच्या पुर्वतयारीचे नियोजन करण्यात आले. या परिषदेच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय स्तरावर उपराजधानीची आकर्षक पध्दतीने प्रतिमानिर्मिती (ब्रॅंडींग) करण्यासाठी विविध प्रशासकीय यंत्रणा विविध पातळ्यांवर प्रयत्न करणार आहेत.
विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या या बैठकीस महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सुर्यवंशी, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, महामेट्रोचे सरव्यवस्थापक संदीप बापट, उपायुक्त आशा पठाण, माहिती संचालक हेमराज बागूल, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे, दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राचे संचालक दिपक खिरवडकर आदींसह विविध यंत्रणाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
जी-२० या राष्ट्रसमुहाची वार्षिक परिषद पुढील वर्षी भारतात होणार आहे. या परिषदेच्या निमित्ताने देशभरातील प्रमुख शहरांत विविध गटांच्या बैठका होणार आहेत. त्यात मुंबई, पुण्यासह नागपूर येथेही बैठक नियोजित आहे. त्यासाठी विविध देशांचे प्रतिनिधी शहरात मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून २१ आणि २२ मार्च रोजी ही बैठक होणार आहे. या राष्ट्रसमुहाअंतर्गत संशोधन आणि नाविन्यपूर्णता गटाचे प्रतिनिधी प्रामुख्याने नागपूर शहरात येणार आहेत. त्यानिमित्ताने शहरातील विविध प्रमुख महत्वाच्या स्थळांचे सौदर्यीकरण करण्यात येणार आहे. तसेच विविध उपक्रमांचेही आयोजन होणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर नागपूर शहराची चांगल्या पध्दतीने दखल घेतली जावी तसेच त्याचा या शहराच्या प्रतिमानिर्मितीसाठी लाभ व्हावा या उद्देशाने शहरात कार्यरत असणाऱ्या विविध प्रशासकीय यंत्रणा कसोशीने प्रयत्न करणार आहेत.
महापालिका, मेट्रो, नागपूर सुधार प्रन्यास, विमानतळ प्राधिकरण, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अशा विविध संस्था त्यासाठी नियोजन करीत आहेत. नागपूर महापालिकेतर्फे करण्यात येणाऱ्या प्राथमिक नियोजनाचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. विभागीय आयुक्तांनी याबाबत सर्व प्रशासकीय विभागांनी काटेकोर नियोजनासह तत्परतेने कार्यवाहीच्या सुचना केल्या.