– ना. गडकरी, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण
– महिला आघाडी अध्यक्ष प्रगती पाटील ची संकल्पना
नागपूर :- नागपुरातील महिलांना उद्योग, शिक्षण, आरोग्य आणि कायदेविषयक मार्गदर्शन मिळावे या हेतूने भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने ‘हॅलो यशस्विनी’ या हेल्पलाईनचे ( *9545759966* ) लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आमदार विकास ठाकरे, आमदार आमदार प्रवीण दटके, माजी खासदार विकास महात्मे, भाजपचे शहर अध्यक्ष बंटी कुकडे, भाजप महिला आघाडीच्या महानगर अध्यक्ष प्रगती पाटील, महामंत्री सारिका नांदुरकर, प्रीती राजदेरकर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना ना. नितीन गडकरी म्हणाले, भाजप महिला आघाडीने सुरू केलेली हेल्पलाईन महिलांना अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. महिलांनी महिलांसाठी सुरू केलेला हा उपक्रम स्तुत्य असून शहरातील महिलांनी याचा स्वविकासासाठी लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महिला आघाडीच्या या उपक्रमाचे कौतुक केले. केवळ महिलांना एकत्रित करून महिला दिनाचा औपचारिक कार्यक्रम घेण्यापेक्षा महिलांच्या उत्कर्षासाठी महिला दिनी हेल्पलाईन सुरू करत नवा पायंडा घातला, याबद्दल महिला आघाडीच्या महानगर अध्यक्ष प्रगती पाटील यांच्यासह सर्व सदस्य कौतुकास पात्र असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
महिला आघाडीच्या महानगर अध्यक्ष प्रगती पाटील यांनी हॅलो यशस्विनी हेल्पलाईनची संकल्पना समजावून सांगितली. आयुष्यात यशस्वी होऊ पाहणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी ही हेल्पलाइन असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.