संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– 23 मार्च रोजी कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे यांच्या जीवनावर आधारित ‘कर्मवीर’स्मरणीकेचे प्रकाशन
कामठी :- माजी सांसद सदस्य व बिडी कामगारांचे हृदय सम्राट कर्मवीर ऍड. नारायण हरी कुंभारे उपाख्य दादासाहेब कुंभारे यांचा जन्म बिडी उत्पादनाचे एक प्रमुख केंद्र असलेल्या कामठी शहरात 23 मार्च 1923 रोजी झाला.समाजाच्या सर्व आघाड्यावर प्रमुख भूमिका वठवून आपल्या बहुगुणी नेतृत्वाने समाजाच्या विकासासाठी त्यांनी उभारलेले कष्ट समाज कधीही विसरू शकत नाही .कर्मवीर ऍड. दादासाहेब कुंभारे यांच्या जीवनकाळातील भरीव कार्य भारतीयांच्या चिरस्मूर्तीत सदैव कायम राहील . यावर्षी 23 मार्च हा कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे यांचा जन्मशताब्दी वर्षनिमित्त 22 व 23 मार्च ला कामठी येथील कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे परिसरात दोन दिवसीय भव्य जन्मशताब्दी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक ,धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यानुसार 22 मार्च ला सायंकाळी 4 वाजता कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे यांच्या शिल्पाचे अनावरण ,ड्रॅगन पॅलेस मेट्रो स्टेशनचे भूमीपूजन तर 23 मार्च ला सायंकाळी 4 वाजता कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे यांच्या जीवनावर आधारित ‘कर्मवीर’ स्मरणिकेचे प्रकाशन होणार आहे.तेव्हा या दोन दिवसीय भव्य जन्मशताब्दी महोत्सवला जास्तीत जास्त संख्येत नागरिकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे यांनी आज ड्रॅगन पॅलेस टेम्पल सभागृहात आयोजित पत्रपरिषदेतून केली आहे.
कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे हे परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी उभारलेल्या सामाजिक न्यायाच्या ऐतिहासिक लढ्यातील अत्यंत निष्ठावंत ,निर्भीड,निश्चयी नि:स्पृह व थोर संघर्षशील लोकनेते म्हणून ख्यातकीर्त आहेत.’बिडी मजदूर चळवळ व ‘आंबेडकरी चळवळ’ या दोन्ही आंदोलनातील त्यांचे योगदान अतुलनीय आहे.कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांनी सर्वस्वी त्याग करून दलित,शोषित ,वंचीत तसेच मजूर -कामगारांना त्यांचे कायदेशिर हक्क व अधिकार प्राप्त करून देण्यासाठी आजीवन संघर्ष केला.कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे एक कुशल संघटक ,उत्कृष्ट संसदपटू ,मजुराचे सजग कल्यांणमित्र,अजातशत्रू,सत्यानवेशी लेखक,साक्षेपी विचारवंत, युगद्रष्टे कवी व बिडी कामगारांचे हृदयसम्राट होते.लढवय्या लोकनेता म्हणून त्यांचे सामाजिक ,शैक्षणिक ,सांस्कृतिक ,धार्मिक व राजकीय क्षेत्रातील योगदान अतुलनीय आहे.
22 व 23 मार्च या दोन दिवसीय कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे यांच्या भव्य जन्मशताब्दी महोत्सव कार्यक्रमा अंतर्गत बुधवार दिनांक 22 मार्च रोजी सायंकाळी चार वाजता कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे यांच्या शिल्पाचे अनावरण केंद्रीय मंत्री सडक परिवहन व राजमार्ग भारत सरकार नितीन गडकरी यांच्या शुभ हस्ते होणार आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहतील.या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व खासदार व माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तसेच खासदार कृपाल तुमाने,कामठी विधानसभेचे आमदार टेकचंद सावरकर,माजी मंत्री नसीम खान तसेच महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे महाप्रबंधक ब्रिजेश दीक्षित ,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव सुमंत भांगे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.दरम्यान केंद्रीय मंत्री ना नितीन गडकरी यांच्या शुभ हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्य उपस्थितीत ड्रॅगन पॅलेस मेट्रो स्टेशनचे भूमिपूजन होणार आहे.तसेच विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे देशाच्या काना कोपऱ्यातून येणाऱ्या अनुयायांसाठी पर्यटक यात्री निवास तसेच देशविदेशातून येणाऱ्या पर्यटका करिता आंतरराष्ट्रीय पर्यटक अतिथीगृह चे भूमिपूजन होणार आहे.तर दुसऱ्या दिवशी 23 मार्च रोजी कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त 23 मार्च 2023 रोजी सायंकाळी 4 वाजता कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे यांच्या जीवनावर आधारीत ‘कर्मवीर’स्मरणिकेचे प्रकाशन सुप्रसिद्ध अभिनेते ,सिनेदिग्दर्शक -निर्माता नागराज मंजुळे यांच्या शुभ हस्ते तसेच भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.याप्रसंगी शैक्षणिक,सामाजिक ,धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या 100 समाजसेवी संस्थांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सुदधा करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे माजी माजी ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच माजी खासदार व पीआरपी चे संस्थापक -अध्यक्ष प्रा जोगेंद्र कवाडे, रिपाईचे महासचिव व दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य राजेंद्र गवई व रिपाई(खो)यांचे ज्येष्ठ नेते माजी आमदार उपेंद्र शेंडे इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी 23 मार्च 2023 रोजी सकाळी साडे दहा वाजता पूज्य भिख्खू संघाच्या उपस्थितीत विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे विशेष बुद्ध वंदना व धम्मदेसना होणार आहे .याप्रसंगी बौद्ध धम्म उपासिका नलिनी कुंभारे यांच्या शुभ हस्ते उपस्थित पूज्य भीक्खु संघाला चिवरदान ,भोजनदान व संघदान देण्यात येईल.
कर्मवीर दादासाहेब कुंभारे जन्मशताब्दी महोत्सव यशस्वीतेसाठी ओगावा सोसायटी, विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल,डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र, ड्रॅगन पॅलेस मेडिटेशन सेंटर,हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था, दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षण संस्था ,हरदास विद्यालय ,ड्रॅगन इंटरनॅशनल स्कुल ,दादासाहेब कुंभारे विद्यालय नेरी,ओगावा इंटरप्रायजेस प्रायवेट लिमिटेड, जयभारत कामगार सहकारी संस्था,महाराष्ट्र राज्य बिडी उत्पादक मजदूर संघ, दादासाहेब कुंभारे बिडी उत्पादक मजदूर सहकारी संस्था, बहुजन रिपब्लिकन एकता मंच ,निर्धार महिला व बालविकास समिती यासह संस्थेचा सक्रिय सहभाग राहणार आहे.