नागपूर :- सेलू (जि. वर्धा) तालुक्यातील आयटीआयतील अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्ता, विद्या वेतन अनुदान वाटपातील भ्रष्टाचार प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधान परिषदेत दिली आहे. विधान परिषद सदस्य आमदार उमा खापरे यांनी सदर प्रकरणाबाबत मुद्दा उपस्थित केला होता.
उपस्थित केल्या गेलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मंत्री लोढा यांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली आणि भ्रष्टाचार करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस सरकार पाठीशी घालणार नाही,असे ठामपणे सांगितले. २०१८ ते २०२३ या कालावधीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची तक्रार समोर येताच त्यावर एक कमिटी स्थापन करून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कमिटीने सादर केलेल्या अहवालानुसार अनुसूचित जाती जमातीतिल विद्यार्थ्यांना त्यांचे विद्या वेतन आणि निर्वाह भत्ता बँक अकाउंट असताना सुद्धा ऑनलाईन ट्रान्सफर न करता रोख रक्कम दिल्याचे समोर आले. असे करणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
तसेच यापुढे अशा प्रकारची कोणतीही घटना घडू नये यासाठी सरकारद्वारे एक जीआर काढण्यात येईल, ज्यामुळे ऑनलाईन पद्धतीने अनुदान वाटप करणे अनिवार्य ठरेल आणि कोणताही भ्रष्टाचार होणार नाही असे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले आहे.