नागपूर :- नागपूरच्या राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयातून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेले अधिकारी, जवान हे केवळ अग्निशमनच नव्हे तर कुठल्याही नैसर्गिक संकटामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता पराकोटीची तत्परता दाखवून आपले कर्तव्य सर्वोच्च प्राथमिकतेने पार पाडतात. त्यांच्या या अतुल्य शौर्याला तसेच बलिदानाला राष्ट्र विनम्र अभिवादन करते असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज नागपूर मध्ये केले. नागपूरच्या राजनगर स्थित केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधीन असणाऱ्या राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय आणि अग्निशमन सेवा, नागरिक सुरक्षा तसेच गृह रक्षक महासंचालनालयाच्या द्वारे अग्निशमन सेवा ,नागरिक सुरक्षा आणि गृहरक्षक वीरता पदक त्याचप्रमाणे अग्निशमन अभियांत्रिकीच्या प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना पदक वितरण करण्याच्या समारंभाच्या मुख्य अतिथीच्या स्थानावरून नित्यानंद राय बोलत होते. याप्रसंगी अग्निशमन सेवा, नागरिक सुरक्षा तसेच गृह रक्षक महासंचालनालयाचे महासंचालक ताज हसन(भापोसे), राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाचे संचालक आर. एम. क्षीरसागर प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांद्वारे राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक पुरस्कार 2021 आणि 2022 चे वितरण अग्निशमन विभागातील अधिकारी आणि कर्मचा-यांना करण्यात आले.
राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयातून प्रशिक्षण तसेच कौशल्य प्राप्त विद्यार्थी आणि अधिकारी चांगल्या स्थानावर जाऊन आपल्या कर्तुत्वाच्या सहाय्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा आपली ओळख प्रस्थापित करत आहेत. याचाच परिणाम म्हणून आपले शेजारी देश सुद्धा त्यांच्या अग्निशमन अधिकाऱ्यांना या महाविद्यालयात प्रशिक्षण देण्यासाठी इच्छुक आहेत असे नित्यानंद राय यांनी सांगितले. अग्निशमन सेवेमध्येच राष्ट्रसेवा आहे. ‘राष्ट्रप्रथम’ याचे ध्येय नैसर्गिक संकटाच्या प्रसंगी मदत कार्य, वित्तहानी टाळण्यासाठीचे कार्य यामधून अग्निशमन सेवेतील अधिकारी आणि जवान यांच्यामाध्यमातून साध्य होत आहे. अग्निशमन सेवा अभियांत्रिकीचे विद्यार्थी या अभ्यासक्रमाद्वारे रोजगार यासोबतच देश सेवेची संधी सुद्धा प्राप्त करत आहे असे नित्यानंद राय यांनी यावेळी स्पष्ट केले.
याप्रसंगी बोलताना अग्निशमन सेवा, नागरिक सुरक्षा तसेच गृह रक्षक महासंचालनालयाचे महासंचालक ताज हसन यांनी सांगितले की 1956 मध्ये उत्तर प्रदेशच्या रामपूर येथे राष्ट्रीय अग्निशमन सेवा कॉलेज महाविद्यालयाची स्थापना केंद्रीय गृह मंत्रालयाद्वारे करण्यात आली होती 1957 ला हे महाविद्यालय नागपूर येथे स्थलांतरित करण्यात आले. अग्निशमन अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला या महाविद्यालयात प्रवेश घेणारे विद्यार्थी हे शंभर टक्के प्लेसमेंट साठी पात्र ठरत असून खाजगी महाविद्यालयांच्या तुलनेत राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयात गुणवत्तापूर्ण शिक्षण हे कमी खर्चात दिले जात आहे.
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अग्निशमन सेवा महाविद्यालयाचे संचालक आर. एम. क्षीरसागर यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी अग्निशमन सेवा महाविद्यालयातर्फे एका पुस्तिकेचे सुद्धा प्रकाशन नित्यानंद राय यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण सुद्धा केले. या कार्यक्रमाला वीरता पदक प्राप्त अधिकारी, त्यांचे कुटुंबीय, राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाचे अधिकारी, विद्यार्थी उपस्थित होते.