संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना मार्च 2020 मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत समाविष्ट असलेल्या लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती प्रति महिना 5 किलो अन्नधान्य मोफत देण्यासाठी सुरू करण्यात आली होती.तर सरकारने देशभरात जारी केलेल्या मोफत रेशन योजनेचा लाभ घेणे आता अधिकच सोपे ठरणार आहे. रेशनकार्ड व्यतिरिक्त मोफत रेशन योजनेच्या अंतर्गत आता आधार कार्डद्वारेही संबंधिताला रेशन प्राप्त करता येणार आहे. मात्र त्यासाठी रेशन कार्ड धारकाचा आरसीआयडी क्रमांक मिळणे गरजेचे आहे जर त्या शिधापत्रिका धारकाला आरसीआयडी नंबर मिळाला असेल आणि कुठल्या कामानिमित्त वा काही कारणास्तव रेशन कार्ड नसल्यास आधार कार्ड द्वारेही रेशन ची उचल करता येणार आहे.
पण या सुविधेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड वर आरसीआयडी नंबर असणे गरजेचे आहे सोबतच आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे.केंद्र आणि राज्य सरकार कडून सर्वत्र मोफत रेशन तसेच माफक दरात रेशन देण्यात येत आहे तर आधार कार्डद्वारे मिळणाऱ्या रेशन या सुविधेमुळे स्थलांतरित लाभार्थ्यांना मोठी सोय होणार आहे.आधार कार्डद्वारे देशभरात कुठूनही रेशन (अन्नधान्य)मिळविता येणार आहे.तसेच एखादा लाभार्थी देशातील अन्य ठिकाणी स्थलांतरित झाल्यास त्याचे रेशनकार्डला आरसीआयडी नंबर प्राप्त असेल व आधार कार्ड अपडेट असेल तर त्या लाभार्थ्याला आधार कार्डद्वारे कुठल्याही समस्येशिवाय रेशन प्राप्त करता येणार आहे.