– भारतीय अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचा प्रयत्न
– बांगला देशातून आणले तीन लाख बनावट नोटा
– लोहमार्ग पोलिसांनी केला आंतरराज्यीय टोळीचा भंडाफोड
नागपूर :- भारतीय चलनात नसलेल्या पाचशेच्या बनावट नोटा बांंगला देशातून भारतात आणल्या. महानगरातील बाजार आणि गर्दीच्या ठिकाणी त्याचा वापर केला. नागपूर रेल्वे स्थानकावरही तसा प्रयत्न केला असता आरोपीला अटक करण्यात आली. त्याच्या विरूध्द नागपूर लोहमार्ग पोलिसात गुन्हा नोंदवून सखोल तपास करण्यात आला. या प्रकरणी सात आरोपींना अटक करून न्यायालयाच्या आदेशाने त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली.
लखफर मंडल (42) रा. पश्चिम बंगाल, मामून मंडल (19) रा. ग्रामीण, पश्चिम बंगाल, यमुना प्रसाद शाह (35) रा. पुणे, इंद्रजित मंडल (33) रा. पश्चिम बंगाल, संतोष मंडल (36) रा. मालदा, किशोर शिंदे (32) रा. चाकण, पुणे, आणि शशीकला उर्फ सानिका दौंडकर (42) रा. पुणे अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
पाच आरोपींना पश्चिम बंगाल तर दोन आरोपींना पुणे येथून अटक करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून 70 हजार 500 रुपये भारतीय चलनात नसलेल्या बनावटी नोटा जप्त करण्यात आल्या. यात 500 रुपयांच्या 71 नोटा आहेत. या टोळीचा म्होरक्या इनामुल हक (40) रा. मालदा, पश्चिम बंगाल हा बनावट नोटांचा व्यवसाय करतो. सध्या तो मालदाच्या कारागृहात आहे.
लखपर हा बांधकाम मिस्त्री आहे तर संतोष हा त्याचा साडूभाउ आहे. मामुनी ही लखपरची मुलगी. यमुना हा मामुनीचा प्रियकर आहे. शशीकला ही घटस्फोटीत असून किशोर तिचा प्रियकर आहे. किशोर पुण्यातील एका खाजगी बँकेत कामाला होता. विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. इंद्रजित आरोपींच्या गावातील असून तो इनामूलच्या संपर्कात होता. ईनामुलने एक लाख भारतीय चलणी नोटाच्या बदल्यात बांगला देशातून तीन लाख रुपये आणले. इंद्रजितने त्याच्याकडून तीन लाख घेतले तर लखपरने इंद्रजितकडून साडेतीन लाख बनावट नोटा घेतल्या आणि सर्व आरोपींनी त्या बनावट नोटा महानगरातील बाजारात पसरविल्या.
पोलिस निरीक्षक मनीषा काशीद यांनी केवळ एका पाचशेच्या बनावट नोटा वरुन सखोल तपास केला. तांत्रिक तपासाच्या आधारे ठिकठीकानी तपास करून सात आरोपींना पकडले. ही कारवाई लोहमार्ग पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, उपविभागीय पोलिस अधिकारी पांडूरंग सोनवने यांच्या मार्गदर्शनात पोनि काशीद, सपोनि निलम डोंगरे, पोहवा संजय पटले, पुष्पराज मिश्रा, सतीश बुरडे, प्रवीण खवसे, अमोल हिंगवे, मजहर अली, रोशन मोगरे, समीर खाडे, विशाल मिश्रा, रोशना डोय यांनी केला.
जागरुक विक्रेत्याची सतर्कता
हावडा मुंबई गीतांजली एक्सप्रेस प्लॅटफार्म क्रमांक 6 वर थांबली होती. त्यावेळी खाद्य पदार्थ विक्रेता अनिल तिवारी (36) रा. सुरेंद्र गढ याला एका प्रवाशाने बोलाविले. 500 रुपयाची नोट दिली आणि 50 रुपयाचे खाद्य पदार्थ घेतले. अनिलने त्याला 450 रुपये परत केले. मात्र, 500 रुपयाची नोट बनावट असल्याचा संशय आला. त्याने प्रवाशाकडे धाव घेतले. मात्र, तो पळाला. दरम्यान गाडी सुरू झाली. त्याने आरडा ओरड केली. तेव्हा आरपीएफ जवान आशिष कुमार लक्ष्यकारच्या मदतीने त्याला पकडले. त्याच्या तक्रारीवरून आरपीएफने कायदेशिर कारवाई केली.