– दीक्षाभूमीवर चार दिवसीय बुद्ध महोत्सव
नागपूर :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांना बुद्ध धम्माची दीक्षा दिली. तेव्हा पासून नागपुरची दीक्षाभूमी जगाच्या नकाशावर झळकत आहे. बौध्द बांधवांची ही प्रेरणा भूमी अधिक मजबूत करण्यासाठी संघठीत होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष तथा धम्मसेनानायक भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीतर्फे दीक्षाभूमी येथे चार दिवसीय बुद्ध महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या दुसर्या दिवशी शांती, करूणा, मैत्री आणि बुद्धाचा कल्याणाचा मार्ग या विषयावर भिक्खू संघाचे प्रवचन झाले. त्या प्रसंगी ससाई अध्यक्षस्थानाहून बोलत होते. त्रिशरण पंचशीलाने कार्यक्रमाची सुरूवात झाली.
वैशाख पोर्णिमेच्या दिवशी तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण झाले. त्यामुळे पृथ्वीतलावरील मानवांसाठी हा दिवस अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे बुद्ध जयंती थाटात साजरी व्हावी, अशी अपेक्षा ससाई यांनी व्यक्त केली.
यावेळी बुद्धिस्ट सेमिनरीचे प्रमुख भदन्त धम्मसारथी यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म याविषयावर प्रवचन केले. यावेळी भदन्त धम्मप्रकाश यांनी बुद्धाचे चार आर्यसत्य, अष्ठांगीक मार्ग आणि त्याचे मानवाला होणारे फायदे याविषयी मार्गदर्शन केले. भदन्त नागवंश यानी तथागातांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण तर भदन्त धम्म विजय यांनी बुद्धाचा सिध्दांत, बुद्धाची शिकवण आणि दहा पारमीता याविषयावर सविस्तर प्रचवण केले. आभार डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले यांनी मानले. कार्यक्रमाला स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे यांच्यासह भिक्खू संघ, भिक्खुनी संघ, उपासक, उपासिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
डॉ. आंबेडकर आणि विपश्यना यावर मार्गदर्शन
शनिवारी (6 मे) प्रसिध्द साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर डॉ. आंबेडकर आणि विपश्यना यावर मार्गदर्शन करतील. प्रबुद्ध साठे, आचार्य वानखेडे, स्मारक समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले यांचेही मार्गदर्शन होणार आहे.