संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विशेष बुद्ध वंदना
-सकाळी 10.30वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक संशोधन केंद्रात डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
– ड्रॅगन पॅलेस व डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक आकर्षक विद्दुत रोषणाईने सज्ज
कामठी :- भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे विविध शैक्षणिक,धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन 11 एप्रिल ते 14 एप्रिल पर्यंत करण्यात आले आहे.
14 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुज्यनिय भिक्षु संघाच्या उपस्थितीत विशेष बुद्ध वंदना घेण्यात येणार आहे तपश्चात ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरात असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्रात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या प्रमुख व माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन वाहण्यात येईल.याप्रसंगी ड्रॅगन पॅलेस टेम्पल,डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र,ड्रॅगन पॅलेस विपस्यना मेडिटेशन सेंटर, हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था, हरदास विद्यालय, ड्रॅगन इंटरनॅशनल स्कुल, दादासाहेब कुंभारे विद्यालय नेरी, दादासाहेब कुंभारे प्रशिक्षण केंद्र येथील धम्मसेवक-धम्मसेविका, संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी व शिक्षकवृंद कर्मचारी यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन वाहण्यात येईल.
-कामठी शहरात भव्य रॅलीचे आयोजन
14 एप्रिल ला सायंकाळी सात वाजता प्रबुद्ध नगर नया गोदाम येथील परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूतळ्याला माल्यार्पण करून भव्य रॅलीचा शुभारंभ होणार आहे. कामठी येथील प्रमुख मार्गाने भ्रमण करून या भव्य रॅलीचा समारोप जयस्तंभ चौक येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ होणार आहे.
परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वस्ती वस्तीत जय्यत तयारी सुरू आहे. पंचशील व निळ्या झेंड्यानी शहर सुशोभित करण्यात आले आहे. ठिकठिकाणी थंड पेय,मिठाई,वितरित करण्याकरिता अनेक संस्था पुढे आल्या आहेत. प्रशासनाने रॅलीची परवानगी रात्री 12 वाजेपर्यंत वाढवल्याबद्दल ऍड सुलेखा कुभारे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीचे आभार मानले आहेत.