बुध्द कुटी येथे बुध्द वंदना प्रसंगी भदंत ससाई
नागपूर :- धम्माशी निगडीत विविध प्रश्न आहेत तसेच भिक्खुंच्या देखील अडचणी आहेत. त्याची सोडवणूक करण्यासाठी भिक्खु संघाने संघटित होण्याची गरज आहे. असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष तथा आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्मगुरू भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी केले. रविवार 30 ऑक्टोबर रोजी सकाळी पाटणकर चौकातील संघप्रिया थेरी यांच्या बुध्द कुटी विहार येथे वर्षावास कार्यक्रमाचा समारोप झाला, त्याप्रसंगी ससाई बोलत होते. यावेळी ससाई यांनी परित्रान पाठ घेतला आणि मंगल कामना केली.
बौद्ध धम्मात पौर्णिमेला फार महत्त्व आहे. कारण तथागत बुद्धाच्या जीवनात ज्या ज्या मंगल घटना घडल्या, त्या पौर्णिमेलाच घडलेल्या आहेत. पौर्णिमेला तथागत बुद्धांनी साठ भिक्खुंचा समूह झाल्यावर संघाची स्थापना केली. अशा कारणांनी आषाढ पौर्णिमा महत्त्वाची आहे.
वर्षा म्हणजे पाऊस, वास म्हणजे निवास किंवा निवारा. तथागत गौतम बुद्धांनी भिक्खुंसाठी पावसाळ्याचे तीन महिने त्रास होऊ नये यासाठीच वर्षावास जाहीर केला. भिक्खुने तीन महिने कुठेतरी विहारात, चैत्यस्तूपात आपला वर्षावास करावा. स्थानिक उपासक- उपासिकांना धम्म उपदेश करावा. तीच परंपरा आजही कायम आहे, असेही ससाई म्हणाले.
धम्म पथावर चालण्यासाठी आणि धम्माचा उपदेश देण्यासाठी धम्मज्ञान आवश्यक आहे. असे सांगून ससाई म्हणाले, केवळ परित्राण पाठ करून उपयोग नाही, भिक्खु संघाने धम्माचा प्रचार प्रसार करावा. उपासक उपासिकांना धम्म सांगावा. देशभरात भिक्खु मोठया प्रमाणावर आहेत. मात्र, संघटित नसल्याने त्यांच्या समस्या कळत नाही. अनेकांनी राहण्याची आणि भोजनाचीही समस्याही असतील, असेही ससाई म्हणाले.
या प्रसंगी धम्म प्रकाश, प्रज्ञाबोधी, धम्मबोधी, भीमा बोधी (जपान), थेराशिमा (जपान), नागसेन, भीमा बोधी, विनया शीला, अश्वजित, मिलिंद यांच्यासह भिक्खुनी संघप्रिया थेरी, नागकन्या थेरी, संघमित्रा थेरी, धम्म सुधा, किसा गौतमी, पुन्नीका, धम्मशीला, धम्मप्रीया, पद्मशीला, बोधी आर्या, श्रामनेरी आम्रपाली यांच्यासह उपासक उपासिका उपस्थित होते.