अनुभूती इन्क्लुझिव्ह पार्क दिव्यांगांसाठी भारतातील अव्वल दर्जाचे केंद्र म्हणून नावारूपास येईल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Ø केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पार्कचे लोकार्पण

नागपूर :- दिव्यांगांना विकासच्या प्रवाहात आणण्यासह त्यांचे जीवन अधिक सुखकर व्हावे यादृष्टीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या दूरदृष्टीतून आजच्या कालसुसंगत अनेक योजना साकारल्या आहेत. त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून नागपूर येथे साकारलेले अनुभूती इन्क्लुझिव्ह पार्क दिव्यांगांना आत्मसन्मानासह मनोरंजनाचा, निरोगी जीवनाचा मंत्र देणारे भारतातील अव्वल दर्जाचे केंद्र म्हणून ओळखले जाईल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

दिव्यांग बांधवांना आपल्या नैसर्गिक क्षमता व गरजेनुरूप निरोगी जीवनाला प्रवाहित करणारे मनोरंजन केंद्र मिळावे या दृष्टीने साकारलेल्या अनुभूती इन्क्लुझिव्ह पार्कच्या लोकार्पण समारंभात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, आ. कृष्णा खोपडे, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, नासुप्रचे विश्वस्त संदीप इटकेलवार, स्थानिक नगरसेवक यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात योजना पूर्णत्वास आणल्या आहेत. आज त्याचा फायदा दिव्यांगांना होत असल्याचे दिसून येते. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या अनेक योजना असून दिव्यांगासाठी विविध प्रकारच्या सोयी आणि विविध प्रकारचे गॅजेट्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सर्वसमावेशक दिव्यांग विकास हेच शासनाचे धोरण असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

शहरातील दिव्यांगांसाठी अप्रतिम अशा अनुभूती इन्क्लुझिव्ह पार्कची निर्मिती करण्यात आली आहे. हा पार्क तयार करताना विविध प्रकारचे दिव्यंगत्व असलेल्या मुला-मुलींसाठी आवश्यक सर्व गोष्टी या ठिकाणी पहायला मिळतात. मनोरंजनासह थेरेपीची सुविधाही या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ख-या अर्थाने हा पार्क दिव्यांगांसाठी एक हक्काची जागा असल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात भरतीची प्रक्रिया सुरू केली. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये दिव्यांगासाठी आरक्षण ठेवून आणि नोकरीमध्ये कसे समाविष्ट करता येईल, याचाही प्रयत्न सुरू असल्याचेही फडणवीस म्हणाले. दिव्यांग शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी या पार्कमध्ये येण्याची गरज आहे. येथे त्यांना सहज पोहोचता यावे यादृष्टीने वाहन व्यवस्थेसाठी जिल्हा विकास नियोजनातून निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले की, उज्जैन येथे सर्वप्रथम दिव्यांग पार्कची निर्मिती करण्यात आली. दौ-यावेळी असताना उज्जैनमध्ये हा पार्क पाहिला असता नागपुरात असा पार्क असावा अशी कल्पना सुचली. त्यानंतर नागपूर सुधार प्रन्यासच्या सहाय्याने या पार्कची एका वर्षाच्या आत करण्यात आली. पूर्व नागपुरात अनेक विकासकामे सुरू आहेत. येत्या काळात अनेक शैक्षणिक संस्थाचे कॅम्पस या भागात येणार असून विकासाची ही घोडदौड अशीच सुरू राहणार असल्याचे मंत्री गडकरी म्हणाले.

नागपूर सुधार प्रन्यास व नागपूर महानगर विकास प्राधिकरणातर्फे जनतेला उपलब्ध असलेल्या सेवांची माहिती असलेल्या ‘राईट टू सर्व्हिस’ या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. पार्कच्या निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या मान्यवरांचा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. पार्कची माहिती देणारी चित्रफितही यावेळी दाखविण्यात आली तसेच शालेय दिव्यांग विद्यार्थ्यानी यावेळी सादरीकरणही केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालना रेणुका देशकर यांनी केले.

अशा असणार दिव्यांग पार्कमधील सुविधा

▪दृष्टिहिनांसाठी टच व स्मेलिंग गार्डन

▪झाडे ओळखण्यासाठी ब्रेल भाषेत पट्टी, ब्रेलयुक्त बुद्धिबळ, सापसिडी व इतर खेळ

▪दिव्यांगसाठी आऊटडोर स्टेडियम असणार जिथे दिव्यांग संगीत ऐकू आणि वाचू शकणार.

▪ओपन जिम आणि ओपन हॉल.

▪दिव्यांगांसोबत सामान्य वयोवृद्ध लोकांनादेखील लाभ मिळणार.

▪ऑटिस्टिक मुलांसाठी देखील ब्लू रूमची व्यवस्था.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची मार्कंडा देवस्थानला भेट

Sat Mar 9 , 2024
गडचिरोली :- अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आज चार्मोशी तालुक्यातील श्रीक्षेत्र मार्कंडेश्वर मंदिरात भेट देऊन श्री महादेवाचे दर्शन घेतले यावेळी त्यांनी नागरिकांच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली. याप्रसंगी महाशिवरात्री यात्रेसाठी मार्कंडा येथे आलेल्या भाविकांशी मंत्री श्री आत्राम यांनी संवाद साधला तसेच महाप्रसादाचे वितरणही केले. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आवश्यक सोयी-सुविधा पुरविण्याच्या सूचना त्यांनी स्थानिक प्रशासनाला केल्या. तत्पुर्वी मंदिर प्रशासन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com