– फुटाळा तलाव येथे दोन हजार तरुण येणार एकत्र
– 101 राष्ट्रध्वजांचे होणार पथसंचलन
नागपूर :- ७८ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्यसाधून १५ ऑगस्टला एक वादळ भारताचं या तरुणांच्या चळवळीच्या वतीने फुटाळा तलाव परिसरात सकाळी ८.३० वाजता ‘राष्ट्रीय ध्वज मार्च पास्ट’ चे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात १०१ राष्ट्रध्वजांचे पथसंचलन होणार असून या कार्यक्रमाला जवळ पास दोन हजार तरुणांचा सहभाग राहणार आहे.
एक वादळ भारताचं हि एक चळवळ आहे सर्व सामाजिक व धार्मिक ठिकाणी झेंडावंदन व राष्ट्रगीत साजर व्हावं यासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठीची हि चळवळ आहे. १५ ऑगस्टला “सामूहिक राष्ट्रगीत गायन” होणार. यंदा या उपक्रमाचे ९ वे वर्ष आहे. नागपूर विदर्भासह, महाराष्ट्र,
मध्यप्रदेश, छत्तीसगढ, गुजरात, तेलंगणा, आंध्रप्रदेश, गोवा या राज्यातील ४५० पेक्षा जास्त ठिकाणांवर हा कार्यक्रम “एक वादळ भारताचं” या चळवळीच्या माध्यमातून साजरा होणार आहे.
राष्ट्रगीत व राष्ट्रीय प्रतिकांचा सन्मान करणे हे प्रत्येक भारतीय नागरीकाचे संवैधानिक कर्तव्य आहे. याच कर्तव्य भावनेचे जागरण करण्यासाठी नऊ वर्षापूर्वी एक वादळ भारताचं ही चळवळ सुरु करण्यात आली. राष्ट्रीय सणांच्या दिवसांचा उपयोग केवळ सुटीसाठी न होता राष्ट्रीय प्रतिकांच्या सन्मानाचा दिवस व्हावा व मनामनात राष्ट्रभावना वृद्धिंगत व्हावी. हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
शालेय विद्यार्थी व नोकरदार यांचा ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात सहभाग असतो. मात्र गृहिणी, ज्येष्ठ नागरीक हे या सोहळ्या पासून वंचित असतात. त्यांनाही याचा लाभ व्हावा या उद्देशाने हि चळवळ सुरु करण्यात आली. नागपुरच्या तरुणांनी कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन ‘एक वादळ भारताचं’ चळवळीचे कार्यकर्ते अश्विन गणवीर, विपूल लोखंडे, ललीत सनेसर, हर्ष मते, अनुराग पाटणे आदींनी केले आहे.