-वेबचर्चा संवाद व मतदार जनजागृती अभियान
नागपूर : 18-18 किलोमीटर अणवाणी चालत मतदानाचा अधिकार बजावणाऱ्या नक्षलग्रस्त भागातील नागरिकांचा आदर्श शहरी मतदारांनी घ्यावा. मतदानाला विरोध असताना, जीवाचा धोका असताना, लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी मनापासून मतदान प्रक्रियेत सहभागी होणारे हे नागरिक खऱ्या अर्थाने लोकशाहीचे पाईक आहेत, असे प्रतिपादन नक्षल भागाचे अभ्यासक, ज्येष्ठ पत्रकार, लोकसत्ताचे निवासी संपादक देवेंद्र गावंडे यांनी आज येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा माहिती कार्यालय, महा आयटी, माहिती केंद्र यांच्यामार्फत दर गुरुवारी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वेब चर्चा संवाद आयोजित करण्यात येते. 25 जानेवारीच्या राष्ट्रीय मतदान दिनाच्या औचित्याला लक्षात घेऊन या वेब चर्चा संवादात ‘स्वातंत्र्यत्तर भारत व ग्रामीण भागातील निवडणुकांचे बदलते स्वरूप’, हा विषय श्रोत्यांसाठी घेण्यात आला होता. राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक प्रक्रियेसाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने विचारवंतांचे पॅनेल गठीत केले आहे. यामध्ये देवेंद्र गावंडे यांचा मार्गदर्शक म्हणून सहभाग आहे.
आज झालेल्या वेबचर्चा संवादात मार्गदर्शन करताना त्यांनी नक्षल भागात त्यांनी अनुभवलेल्या विविध निवडणुका, त्यामध्ये आलेल्या अनेक जीवघेण्या अनुभवांची माहिती दिली. मात्र तरीही लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी ग्रामीण भागातील व नक्षली भागातील मतदार हिमतीने उत्साहाने व जबाबदारीने पुढे येत असल्याचे प्रतिपादन केले.
महानगरांमध्ये मतदानाचा दिवस सुट्टीचा दिवस म्हणून मतदान करण्याऐवजी सहलीला बाहेर पडणाऱ्या शहरी मतदारांनी गडचिरोली सारख्या जिल्ह्यात 18 ते 20 किलोमीटर पायी जाऊन मतदान करणाऱ्या मतदारांचा आदर्श घेतला पाहिजे. लोकशाही व्यवस्थेत अधिक सुविधांची भर नागरी लोकसंख्येला मिळाली आहे. मात्र बोटावर शाई लावली तर बोटे तोडून टाकू, बंदुकीच्या गोळ्या घालू, अश्या धमक्या दिल्यानंतरही कुटुंबकबिल्यासह मतदानासाठी जाणारा आदिवासी बांधव लोकशाही प्रक्रियेमध्ये उजवा ठरतो. आदर्श ठरतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. मतदान प्रक्रियेमध्ये नेहमी ग्रामीण भागात अधिक मतदान होते. लोकशाही व्यवस्थेतील हे सुंदर चित्र आहे. सुविधांचा अभाव, वाहनांचा तुटवडा, उमेदवार घरापर्यंत पोहोचू शकत नाही, मात्र फार उच्चविद्याविभूषित नसताना देखील ग्रामीण भागातील नागरिकांना कोणाला मतदान करायचे? का मतदान करायचे? याबाबतचे मार्गदर्शन करावे लागत नाही. आपला जीव धोक्यात घालून प्रसंगी जीवाचे बलिदान करून लोकशाहीसाठी शहीद झालेल्या नागरिकांची संख्या ग्रामीण नक्षली भागात अधिक आहे. खरेतर मतदानाला किती महत्त्व द्यावे, याचे सुंदर चित्र, उत्तम उदाहरण या भागातील नागरिकांनी निर्माण केलेले आहे. मात्र त्यांचे कर्तृत्व दुर्लक्षित राहिले आहे, अशी खंतही त्यांनी आपल्या निवेदनात केली. मतदान प्रक्रियेसाठी या नागरिकांनी केलेल्या बलिदानाच्या यशकथा पुढे आल्या पाहिजे. या नागरिकांनी लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी आत्तापर्यंत केलेल्या प्रयत्नांची नोंद घेतली गेली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी आपल्या निवेदनात केले.
वेब चर्चा संवादासाठी आलेले देवेंद्र गावंडे यांचे स्वागत जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर अमरावती विभागाचे संचालक हेमराज बागुल, निवडणूक उपजिल्हाधिकारी मीनल कळसकर या कार्यक्रमाला उपस्थित होते.