२५ दिवसांच्या उपोषणानंतरही प्रशासन झोपेत

– नक्षल सप्ताहामुळे मेडीगड्डा धरणग्रस्तांचे आंदोलन अठवडाभर पुढे ढकलले

गडचिरोली :- मेडीगड्डा धरणासाठी अधिग्रहित जमिनीचा योग्य मोबदला देण्यात यावा यासह विविध मागण्या घेऊन १२ गावातील शेतकरी सिरोंचा तहसील कार्यालयापुढे मागील २५ दिवसांपासून साखळी उपोषण करीत आहे. परंतु जिल्हा प्रशासनाकडून अद्याप दखल घेण्यात आलेली नाही. उलट नक्षल सप्ताहाचे कारण पुढे करून प्रशासनाने शांततेत सुरू असलेले आंदोलन काही काळ स्थगित करायला लावल्याने धरणग्रस्त शेतकऱ्यांमधून रोष व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे ११ डिसेंबर पासून शेतकरी पुन्हा उपोषणाला बसणार आहे.

राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंचा तालुक्यातील १२ गावातील शेतकरी मेडीगड्डा धरणामुळे बाधित झाले. दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे शेतीचे अतोनात नुकसान होत असते. धरणाच्या उभारणीच्या वेळेस धरणक्षेत्रात येणारी ३७३.८० हेक्टर जमिन अधिग्रहित करण्यात आली होती. त्यापैकी तात्काळ गरज असलेली २३४.९१ हेक्टर जमीन तेलंगणा सरकारे १०.५० लक्ष एकर प्रमाणे थेट खरेदी केली. त्यानंतर धरणाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. परंतु उर्वरित १३८.९१ हेक्टर अधिग्रहित जमिनीची भूसंपादन प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. रखडलेली भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून योग्य मोबदला देण्यात यावा, पीडितांची प्रकल्पग्रस्त म्हणून नोंद व्हावी यासह विविध मागण्या घेऊन १२ गावातील शेतकऱ्यांनी अनेकदा आंदोलने केली, निवेदन दिले. पण उपयोग झाला नाही. जिल्ह्यात ३७ कलम लागू असल्याने त्यांना सामूहिक पद्धतीने आंदोलन करण्याची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे पीडित शेतकरी मागील २५ दिवसांपासून साखळी पद्धतीने उपोषणाला बसले आहेत. यादरम्यान तहसीलदार सोडल्यास शासन, प्रशासनाकडून एकाही प्रतिनिधीने उपोषणस्थळी भेट दिलेली नाही. जिल्ह्यातील एका नेत्यालाही पीडित शेतकऱ्यांची भेट घ्यायला वेळ नाही. प्रशासन त्यांचे प्रश्न सोडविण्यापेक्षा आंदोलन कसे रोखता येईल याबाबत अधिक उत्सुक आहे. त्यामुळेच नक्षल सप्ताहाचे कारण पुढे करून शांततेत सुरू असलेले साखळी उपोषण बंद करायला लावले. मात्र, शेतकरी आंदोलनावर ठाम असून ११ डिसेंबरपासून ते पुन्हा उपोषणाला बनणार आहे. सोबतच हिवाळी अधिवेशनात देखील नागपूर येथे उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पालकमंत्र्यांनी देखील दुर्लक्ष केल्याने त्यांच्याबद्दल देखील रोष व्यक्त करण्यात येत आहे.

…..कोट….

सिरोंचा तालुक्यातील मेडीगड्डा धरणग्रस्त शेतकरी मागील चार वर्षांपासून योग्य मोबदला मिळावा यासाठी आंदोलन करीत आहे. गेल्या २५ दिवसांपासून पीडित शेतकरी साखळी उपोषणाला बसले आहे. पण एकही प्रशासकीय अधिकारी, नेते त्यांची दखल घेत नाही. हे दुर्दैवी आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः गडचिरोलीचे पालकमंत्री असून त्यांनाही शेतकऱ्यांसाठी वेळ नाही. मी स्वतः उपोषणस्थळी भेट दिली. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. सोबत अहेरी युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष आकाश परसा ही उपस्थित होते. याबाबत पक्षाच्या वरिष्ठांना पर्यंत माहिती पोहोचवणार आहे.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वतंत्र दिव्यांग विभाग असणारे महाराष्ट्र पहिले राज्य दिव्यांगांच्या विभागासाठी ११४३ कोटीची तरतूद - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Sun Dec 4 , 2022
स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा मुंबई :-  जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून राज्यामध्ये स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. त्यासाठी २०६३ पदांची निर्मिती करण्यात आली असून ११४३ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली माहिती देतानाच अशा प्रकारे दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग सुरू करणारे महाराष्ट्र पहिले राज्य असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com