मुंबई :- मराठवाड्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी लवकरच लातूर येथे ‘नमो रोजगार’ महामेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी कौशल्य विकास विभागाचे सहकार्य घेण्यात येईल, असे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
लातूर जिल्ह्यामध्ये कौशल्य विकास योजनेच्या अंमलबजावणीबाबत महसूल मंत्री विखे-पाटील आणि कौशल्य, रोजगार, उद्योजकता नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. या बैठकीस माजी कौशल्य विकास मंत्री संभाजीराव निलंगेकर, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या आयुक्त निधी चौधरी, लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे) यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री विखे पाटील यांनी सांगितले की, ‘एज्युकेशनल हब’ म्हणून मराठवाड्यातील लातूर जिल्हा ओळखला जाते. येथील तरुणांना शिक्षणासोबतच रोजगार मिळावा, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यामुळे नुकताच नागपूर येथे नुकत्याच झालेल्या रोजगार मेळाव्याप्रमाणे लातूर येथे असा नमो महारोजगार मेळावा घेऊन मराठवाड्यातील युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. भविष्यात कौशल्य विकासातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असल्याने कौशल्य विकास, आयटीआय, डीआयसी व व्यवसाय शिक्षण विभागाने यापुढे एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे.
लातूर येथील महारोजगार मेळाव्यास निधी उपलब्ध करून देणे आणि इतर सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री लोढा यांनी दिली.