संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- नागपूर आणि चंद्रपूर विद्यापीठातील तीन समाजकार्य महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्याबाबत समाज कल्याण आयुक्तांनी काढलेला आदेश रद्दबातल करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटून सदर आदेश रद्द करू असा विश्वास नामदार आठवले यांनी बैठकीत व्यक्त केला. असोसिएशन ऑफ सोशल वर्क एज्युकेटर्स अँड मॅनेजमेंटचे अध्यक्ष डॉ. पुरणचंद्र मेश्राम यांच्या नेतृत्वात समाजकार्य महाविद्यालये चालविणाऱ्या संस्था व कर्मचारी संघटनाचे प्रतिनिधीं यांच्या समवेत रविभवन येथे झालेल्या बैठकीत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचेपुढे समाजकार्य महाविद्यालयातील ज्वलंत प्रश्नांवर चर्चा झाली. या बैठकीत बोलताना आठवले म्हणाले की, कोणत्याही समाजकार्य महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्याचा अधिकार हा आयुक्तांना नाही. आयुक्ताने केलेली ही कृती महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियमाच्या तरतुदीशी विसंगत असल्याने सदर आदेश हे पूर्णतः बेकायदेशीर आहेत. त्यामुळे शासनपातळीवर हे आदेश रद्द करण्यासंदर्भात भारत सरकारच्या सामाजिक न्याय विभागाद्वारे महाराष्ट्र शासनाला कळविण्यात येईल.महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्याबाबतचा प्रश्न अत्यंत ज्वलंत स्वरूपाचा असून ह्या कृतीमुळे ९० शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कुटुंब रस्त्यावर आले असुन समाजकार्य शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे त्यामुळे ह्या प्रश्नांची केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने दखल घेतली असून हा प्रश्न तातडीने सोडविण्यासंबंधी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव व व्यवस्थापन संघटनांचे प्रतिनिधी यांची संयुक्त सभा उद्या दिनांक २९ रोजी २०२३ सह्याद्री अतिथिगृह, मुंबई येथे बोलावण्यात आली असून या प्रश्नावर सर्वंकष चर्चा करून सदर महाविद्यालयांची मान्यता पूर्ववत कायम ठेवण्यासंबंधी व समाजकार्य महाविद्यालयातील इतर प्रश्नावर निर्णयात्मक पाउले उचलण्यात येतील असेही ना.आठवले म्हणाले.
केंद्र शासनाच्या शैक्षणिक धोरणानुसार ग्रामीण स्तरावर समाजकार्य शिक्षण पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र राज्यात सन १९९४-९५ पासून ५२ समाजकार्य महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली होती. ही सर्व महाविद्यालये व्यवस्थित सुरू असून समाजामध्ये समाजकार्य करणारे सायंटिफिक कार्यकर्ते निर्माण करण्यासाठी या महाविद्यालयांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यामुळे बेकायदेशीररित्या अशा महाविद्यालयांची मान्यता काढणे ही कृती शैक्षणिक धोरणाविरोधी असुन असवैधानिक ठरते. तसेच समाजकार्य महाविद्यालयांच्या बाबतीत इतरही जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांसंबंधी या बैठकीत चर्चा करून राज्य शासनाला निर्देश देण्यात येतील, असेही आठवले म्हणाले.
ना.आठवले यांना भेटलेल्या शिष्टमंडळात असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. पुरणचंद्र मेश्राम, असोसिएशनचे निमंत्रक सर्वश्री भूपेश थुलकर,प्रकाश कुंभलकर, सुधाकर थोटे, रोशन जांभूळकर,नरेंद्र मोहिते, प्रमोद सातंगे उपस्थित होते तसेच विविध समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापक यांनीसुद्धा यावेळी चर्चेत भाग घेतला. तसेच उद्याच्या बैठकीला डॉ. पुरण मेश्राम व ईतर प्रतिनिधींनी उपस्थित राहुन आपले प्रश्न मांडावे असे आवाहन ना.आठवले यांनी केले. सदर बैठकीत असोसिएशनचे प्रतिनिधी डॉ पुरण मेश्राम, रोशन जांभुळकर हे उपस्थित राहतील.
या प्रसंगी प्राचार्य डॉ. रुबीना अन्सारी, डॉ. प्रणाली पाटील, डॉ. राष्ट्रपाल मेश्राम, प्रा. उज्ज्वला सुखदेवे, डॉ. ओमप्रकाश कश्यप,डॉ.मनोज होले, डॉ. निशांत माटे, प्रा. शशिकांत डांगे, डॉ. मनीष मुडे, प्रा.राहुल जुनगरी, प्रा. राम बुटके, प्रा. गिरीश आत्राम, प्रा. आवेशखरणी शेख, शिक्षकेतर कर्मचारी प्रफुल्ल बागडे, सुभाष तिघरे, उज्ज्वला मेश्राम, गजानन कारमोरे, किरण गजभिये,शशील बोरकर, नीरज वालदे आदी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.