नागपूरकर माझ्या पाठीशी; गडकरींचा विश्वास

– लाकडीपूल महाल आणि बांगलादेश येथे जाहीरसभेचे आयोजन

नागपूर :- महाराष्ट्रात मंत्री असताना आणि गेली दहा वर्षे केंद्रीय मंत्री म्हणून काम करीत असताना नागपूर शहराची प्रामाणिक सेवा करण्याचा मी प्रयत्न केला. आपल्या कामांतून जनतेचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या शहरातील जनता पूर्ण ताकदीने माझ्यासोबत आहे, याचा मला विश्वास आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (शुक्रवार) केले.

मध्य नागपुरात महाल येथील लाकडी पूल आणि बांगलादेश येथील नाईक तलाव परिसरात ना. गडकरी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार विकास कुंभारे, आमदार प्रवीण दटके, भाजपचे शहराध्यक्ष जितेंद्र (बंटी) कुकडे, आगलावे, भोला बैसवारे, अहीरकर यांची उपस्थिती होती.

ना. गडकरी यांनी खासदार म्हणून दहा वर्षे सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल सुरुवातीला जनतेचे आभार मानले. महाल येथील जाहीर सभेत ते म्हणाले, ‘ऑरेंज सिटी, टायगर कॅपिटल अशी नागपूरची ओळख आहे. झिरो माईल असल्यामुळे नागपूरला लॉजिस्टिक कॅपिटल करण्याचा देखील करण्याचा प्रयत्न करतोय. सिंदी ड्रायपोर्टवरून जगातील कुठल्याही देशात थेट आयात-निर्यात करता येणार आहे. नागपूरला आपण ‘एज्युकेशन हब’ बनविण्यासाठी पाऊल टाकले आहे. जागतिक दर्जाचे सिम्बायोसिस नागपुरात आले. आणि आता नरसी मोनजी ग्रूप ही प्रतिष्ठित शिक्षण संस्थाही येणार आहे. मिहानमध्ये जागतिक दर्जाचे एम्स, आयआयएम आले. अन्य संस्था आल्या. या सर्वांतून नागपूरच्या तरुणांना केजी टू पीजी शिक्षण घेण्यासाठी शहराच्या बाहेर जावे लागू नये, असा प्रयत्न आहे.’ येत्या काळात आपल्या तरुणांना रोजगार कसा मिळेल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत मिहानमध्ये ६८ हजार तरुणांना रोजगार मिळाला. वर्ष पूर्ण होण्याच्या आत आणखी १ लाख तरुणांना रोजगार मिळेल आणि पुढील पाच वर्षांत आणखी १ लाख तरुणांसाठी रोजगार निर्माण होतील, याचा मला विश्वास आहे, असेही ते म्हणाले.

‘बांगलादेश-नाईक तलावच्या जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली’

‘गेल्यावेळी नागपूरच्या बांगलादेश भागात निवडणुकीच्या प्रचारासाठी फिरलो. मला खूप प्रेम मिळाले. घराचा मालकी हक्क मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. या कामात अनेक अडचणी आल्या. पण आतापर्यंत अनेक घरांच्या नोंदणी पूर्ण झाल्या आहेत आणि आणखी होत आहेत. नाईक तलाव परिसर सुंदर करण्याचे काम सुरू आहे. या तलावाचे मालक बांगलादेशमधील जनता आहे. रस्ते, उड्डाणपूल, भुयारी मार्ग होत आहेत. दिलेली सगळी आश्वासने पूर्ण करण्याचे काम सुरू आहे,’ असे ना. नितीन गडकरी म्हणाले. नाईक तलाव परिसरात झालेल्या जाहीर सभेला भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार विकास कुंभारे, आमदार प्रवीण दटके, भाजपचे शहराचे अध्यक्ष जितेंद्र कुकडे, आगलावे, भोला बैसवारे, अहीरकर यांची उपस्थिती होती. राजकारण म्हणजे केवळ सत्ताकारण नाही. मी कुणाचे नाव घेत नाही आणि कुणावर टीकाही करत नाही. कारण ‘ये पब्लिक है, सब जानती है’ यावर माझा विश्वास आहे, असेही ते म्हणाले.

‘गरिबांचे नुकसान करून प्रकल्प होणार नाहीत’

गरिबांच्या पोटावर लाथ मारून कुठलाही प्रकल्प पूर्ण होणार नाही. केळीबाग रोड बांधताना तेथील छोट्या व्यापाऱ्यांना मार्केटपेक्षा कमी किमतीत पर्यायी जागा उपलब्ध करून देत आहोत. बुधवार बाजारात हॉकर्ससाठी व्यवस्था केली जाणार आहे. कल्याणेश्वर मंदिराची ९१ कोटींची योजना देखील मंजुरीसाठी गेली आहे. गरिबांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिल्यानंतरच प्रकल्पाचे काम सुरू होईल, असे ना. नितीन गडकरी म्हणाले.

गरिबांचे नुकसान करून प्रकल्प होणार नाहीत’

गरिबांच्या पोटावर लाथ मारून कुठलाही प्रकल्प पूर्ण होणार नाही. केळीबाग रोड बांधताना तेथील छोट्या व्यापाऱ्यांना मार्केटपेक्षा कमी किमतीत पर्यायी जागा उपलब्ध करून देत आहोत. बुधवार बाजारात हॉकर्ससाठी व्यवस्था केली जाणार आहे. कल्याणेश्वर मंदिराची ९१ कोटींची योजना देखील मंजुरीसाठी गेली आहे. गरिबांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिल्यानंतरच प्रकल्पाचे काम सुरू होईल, असे ना. नितीन गडकरी म्हणाले.

नागपूर व्हावे जगातील सर्वांत सुंदर शहर

नागपुरातील ७० टक्के वस्त्यांमध्ये चोवीस तास पाणी पुरवठा होत आहे. ८९ जलकुंभ शहरात बांधण्यात येत आहेत. त्यानंतर लवकरच संपूर्ण शहराला चोवीस तास पाणी मिळेल. नाग नदीत अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईन बांधली जाणार आहे आणि नाग नदी स्वच्छ होणार आहे. पूर्व नागपुरात दिव्यांगांसाठी उत्तम असा दिव्यांग पार्क तयार झाला आहे. भारतातील सर्वोत्तम असे कवीवर्य सुरेश भट सभागृह नागपुरात उभारण्यात आले. प्रत्येक गरिबाला उत्तम असे सिमेंट काँक्रिटचे घर मिळाले पाहिजे. चोवीस तास पाणी, उत्तम वैद्यकीय सुविधा मिळाल्या पाहिजेत, यादृष्टीने कार्य सुरू आहे. आपले शहर सुंदर असले, स्वच्छ आणि प्रदूषण मुक्त व्हावे आणि शहराची चौफेर प्रगती व्हावी, असा माझा प्रयत्न आहे, असा मानस ना. गडकरी यांनी व्यक्त केला.

नागपूरने माझा लौकिक वाढवला

आपल्यामुळे माझे जगात नाव झाले. किती तरी डी. लिटस. आणि अन्य मानद पदव्या मिळाल्या. सात जागतिक विक्रम माझ्या विभागाने केले. मी जगात पोहोचलो, पण हा सन्मान मला तुमच्यामुळे मिळाला. तुम्ही निवडून दिले नसते तर जोझिला टनेल, दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वे, मोठमोठाले महामार्ग बांधता आले नसते. आता मला निवडणुकीतील विजयाचा विक्रमही तुमच्या मदतीने करायचा आहे. त्यासाठी ७५ टक्के मतदान होईल, असा प्रयत्न करा. असे झाले तर ५ लाखांपेक्षा मोठ्या फरकाने मी निवडून येईल, असा विश्वास ना. गडकरी यांनी व्यक्त केला.

लोकसंवाद यात्रेने भारावलो

सहा दिवस मी नागपूरमध्ये लोकसंवाद यात्रा काढली. यात्रेतील चित्र बघून मी भारावलो. महिला, पुरुष, तरुण भर उन्हात माझ्या स्वागतासाठी रस्त्यावर उभे होते. कुणी रांगोळी काढली, पुष्पवर्षाव केला. लोकांचे प्रेम हीच माझी राजकारणातील मिळकत आहे, अशी भावना ना. गडकरी यांनी व्यक्त केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

200 करोड़ रुपए की मांगी फिरौती

Sat Apr 6 , 2024
– दो व्यवसायी भाइयों पर मामला दर्ज  नागपुर :- शहर के दो व्यवसायी भाइयों द्वारा एक ग्रुप के संचालक से 200 करोड़ रुपए की फिरौती मांगने का मामला सामने आया है। व्यवसायी महेश चंद्रभान किंगरानी और राजेश चंद्रभान किंगरानी शिवाजीनगर, धरमपेठ निवासी के खिलाफ सदर थाने में मामला दर्ज किया गया है। व्यवसायी भाइयों पर आरोप है कि उन्होंने गिरवी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com