– ‘वचननामा २०२४’ चे प्रकाशन
नागपूर :- नागपुरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करून शहराला शिक्षण, पर्यटन, उद्योगाच्या क्षेत्रात संपूर्ण देशात नावलौकिक मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे, असा निर्धार व्यक्त करीत भविष्यात देशातील पहिल्या पाच शहरांमध्ये नागपूरचा समावेश होईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (मंगळवार) व्यक्त केला.
रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये ‘वचननामा ते वचनपूर्ती’ या पुस्तिकेचे ना. गडकरी यांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते संजय भेंडे, आमदार प्रवीण दटके, आमदार विकास कुंभारे, शहराध्यक्ष बंटी कुकडे, माजी मंत्री सुलेखा कुंभारे, माजी आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) शहराध्यक्ष प्रशांत पवार, शिवसेनेचे नेते (शिंदे गट) मंगेश काशीकर, माजी खासदार अजय संचेती, वचननामा संयोजन समितीचे सदस्य माजी आमदार गिरीश व्यास व ज्येष्ठ नेते जयप्रकाश गुप्ता, गिरधारी मंत्री, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, माजी आमदार प्रा. अनिल सोले, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, माजी महापौर कल्पना पांडे, माजी महापौर अर्चना डेहनकर, माजी महापौर दयाशंकर तिवारी आदींची उपस्थिती होती.
शहरात विविध ठिकाणी फूड झोन तसेच फुटाळा येथे २५ रेस्टॉरेन्ट आणि हॉकर्स झोन, ऑरेंज सिस्टी स्ट्रीटवर फ्रुट व व्हेजिटेबल झोन, वर्धा रोडवर सेंद्रीय धान्य व भाजी बाजार हे प्रकल्प होणार आहेत. याशिवाय होलसेल किराणा मार्केटसाठी कळमना परिसरात जागा दिली असून त्याचेही बांधकाम सुरू झाले आहे, अशी माहिती ना. गडकरी यांनी यावेळी दिली. ९१ कोटी रुपये खर्चून महालमधील कल्याणेश्वर मंदिराचे कॉम्प्लेक्स, १२०० कोटी रुपये खर्चून सिंदी येथे लॉजिस्टीक्स पार्क आणि शहरात चार ठिकाणी ट्रक टर्मिनल देखील होणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहराचा सर्वांगीण विकास होत असून गेल्या दहा वर्षांत १ लाख कोटींची कामे झाली आहेत. काही कामे सुरु आहेत, तर काही प्रगतीपथावर आहेत. नागपूर शहरासाठी आगामी पाच वर्षासाठी नव्या महत्वाकांक्षी योजना आखल्या असून, त्या पूर्ण झाल्यानंतर नागपूर शहर नवे स्मार्ट शहर म्हणून विकसित होणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मिहानमध्ये आतापर्यंत ६८ हजार युवकांना रोजगार मिळाला असून यात विविध कंपन्या गुंतवणूक करीत आहेत. डिसेंबरपर्यंत हा आकडा एक लाखावर जाईल, असेही ते म्हणाले. बांगलादेश वस्तीच्या धर्तीवर शहरातील सर्व झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना मालकी हक्काचे पट्टे देण्यात येण्याचा येत्या काळात प्रयत्न असेल, असे ना. श्री. गडकरी यांनी सांगितले. सध्या ज्येष्ठांसाठी ७० ते ८० बगीचे विकसित करण्यात येत आहेत, त्यांची संख्या १०० पर्यंत नेण्यात येईल. औद्योगिक क्षेत्रातील रोजगार वाढीसाठी शैक्षणिक संस्था आणि उद्योजक यांच्या समन्वयातून नवी कौशल्य विकास केंद्रे स्थापन करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. अजनी येथे ‘युरोपियन स्क्वेअर’ विकसित करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
असा आहे वचननामा
तीन रेल्वे स्थानकांचा विकास, २५ लाख संत्र्यांच्या झाडांची लागवड, एम्प्रेस मिलच्या जागेवर टेक्सटाइल मार्केट, रिंग रोडवर ट्रॉली बस, पोलीस क्वार्टर्सचा विकास, मेयो ते लकडगंज या मार्गावर सहा मार्केट्स या भविष्यातील संकल्पांचाही ना. गडकरी यांनी वचननाम्याच्या निमित्ताने उल्लेख केला.