चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात होणाऱ्या अतिक्रमण व अनधिकृत बांधकामास आळा घालण्याच्या दृष्टीने विशेष मोहीम राबवून धडक कारवाई करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी दिले आहेत. यासंबंधी बैठक आयुक्त यांच्या कक्षात आज आयोजीत करण्यात आली होती.
मनपाच्या तीनही झोन अंतर्गत अतिक्रमण तसेच अवैध बांधकाम हटविण्यासाठी कारवाई वेळोवेळी करण्यात येत असते. याकरीता अवैध बांधकाम करणाऱ्यांना प्रथम नोटीस बजावण्यात येऊन अतिक्रमण काढण्यास ठराविक कालावधी दिला जातो. यानंतरही अतिक्रमण वा अवैध बांधकाम स्वतः हुन न हटविल्यास मनपातर्फे कारवाई केली जाते.कारवाई दरम्यान महिलांनी अडथळा निर्माण करणे, शासकीय कर्मचाऱ्यावर दबाव आणणे इत्यादी प्रकार अतिक्रमण धारकांकडुन केल्या जातात. यापुढे सदर प्रकार झाल्यास शासकीय सेवकाला कर्तव्यात अडथळा निर्माण करण्याप्रकरणी कलम ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे तसेच कारवाईचा प्रत्यक्ष खर्च, दंड व प्रशासकीय शुल्क संबंधितांकडून वसूल करण्यात येईल.
शहरातील एखादे अतिक्रमण काढण्यासाठी संबंधित अधिकारी सरसावले की, विविध मार्गातुन त्याला विरोध केला जातो यामुळे शहरातील अवैध बांधकाम व अतिक्रमणात मोठय़ा प्रमाणात वाढ होते. अतिक्रमण तसेच अवैध बांधकामाविरुद्ध आलेल्या तक्रारी मग त्या ऑनलाईन आलेल्या व प्रत्यक्ष कार्यालयात प्राप्त झालेल्या असो त्याच शहनिशा करून त्या तात्काळ मार्गी लावण्याचे तसेच कुठल्याही स्वरूपाच्या दबावाला झुगारून कार्य करण्याचे निर्देश आयुक्तांनी सहायक आयुक्त,नगर रचना विभाग व अतिक्रमण पथकाला याप्रसंगी दिले.
मुख्यतः सुटीच्या दिवशी अनधिकृत बांधकास जोर येतो हे लक्षात घेऊन अतिक्रमण निर्मुलन पथक हे शनिवार,रविवार तसेच सुटीच्या दिवशी कार्यरत राहणार आहे. अतिक्रमण व अनधिकृत बांधकामाविरुद्ध ठोस कारवाई मनपातर्फे करण्यात येणार आहे.सदर बैठकीस उपायुक्त अशोक गराटे,सहायक आयुक्त विद्या पाटील,नगररचनाकार राजू बालमवार,सहायक आयुक्त नरेंद्र बोभाटे,सचिन माकोडे,राहुल पंचबुद्धे,सारिका शिरभाते,प्रतिक देवतळे,रमेश चौधरी उपस्थीत होते