– https://pandal.cmcchandrapur.com/ येथे करावा ऑनलाईन अर्ज
चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिका हद्दीत नवरात्र उत्सवासाठी एकल खिडकी योजनेची (single window system ) सुरुवात करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी मंडप, स्टेज उभारण्यासाठी आता मंडळांना ऑनलाईन अर्ज (Application) सादर करता येणार आहेत. सादर केलेल्या अर्जांची छाननी करून संबंधित विभागाकडुन परवानगी मिळाल्यावर महानगरपालिकेतर्फे अंतिम परवानगी प्रदान करण्यात येणार आहे.
येत्या १५ ऑक्टोबर रोजी घटस्थापना असुन २३ ऑक्टोबरपर्यंत नवरात्र उत्सव साजरा होणार आहे. सार्वजनिक मंडळांना महापालिका व इतर विभागाकडून रीतसर परवानग्या घ्याव्या लागणार आहेत. शहर वाहतूक शाखा, अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र, तसेच सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडील नोंदणी प्रमाणपत्र व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे नियमावली बाबत हमीपत्र घेऊन परवानगी दिली जाणार आहे. ऐनवेळी परवानगीसाठी अर्ज न देता लवकरात लवकर परिपूर्ण अर्ज सादर करण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.
महापालिकेने दिलेली परवानगी मंडपाच्या दर्शनी भागावर मंडळांनी लावणे बंधनकारक राहील. सार्वजनिक मंडळाकडून निर्माल्य गोळा करण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहे तसेच पीओपी मूर्ती ठेवणाऱ्या मंडळांवर सक्त कारवाई करण्यात येणार आहे.
एकल खिडकी योजना –
सार्वजनिक ठिकाणी मंडप, स्टेज उभारण्यासाठी मंडळांना ऑनलाईन अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या cmcchandrapur.com या संकेतस्थळावर quick link सदरात pandal permission २०२३ येथे ही लिंक उपलब्ध आहे. अथवा https://pandal.cmcchandrapur.com/ येथे भेट देऊन ऑनलाईन अर्ज करता येईल. यामध्ये पोलीस स्टेशन, ट्राफिक पोलीस स्टेशन,सार्वजनिक बांधकाम, अग्निशमन, महावितरण केंद्र, महानगरपालिका इत्यादी विविध विभागांचे प्रतिनिधी संबंधित सादर केलेल्या अर्जांची छाननी करतील व महानगरपालिकेतर्फे अंतिम परवानगी प्रदान करण्यात येणार आहे.