राज्यपालांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभाचा शुभारंभ

– पंजाबच्या रुरल ऑलिम्पिक प्रमाणे राज्याचा पारंपरिक क्रीडा महोत्सव दरवर्षी व्हावा : राज्यपाल रमेश बैस

– आत्मनिर्भर भारतासाठी स्वदेशी खेळांना प्रोत्साहन देण्याची राज्यपालांची विद्यापीठांना सूचना

– पारंपरिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन प्रत्येक जिल्ह्यामध्ये करण्यात येईल : मुख्यमंत्री

मुंबई :- पंजाब मध्ये होत असलेल्या ‘किला रायपूर खेल महोत्सव’ अर्थात रूरल ऑलिम्पिक प्रमाणे महाराष्ट्रातील कबड्डी, खोखो, दांडपट्टा आदी पारंपरिक क्रीडा प्रकारांचा समावेश असलेला क्रीडा महाकुंभ दरवर्षी भरवल्या जावा, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त यंदा प्रथमच आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ’ या क्रीडा महोत्सवाचे उदघाटन शुक्रवारी (दि. २६) राज्यपाल बैस यांच्या उपस्थितीत जांबोरी मैदान, मुंबई येथे संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.

महाकुंभाच्या उदघाटनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, मुंबई व उपनगर जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, क्रीडा भारतीचे गणेश देवरुखकर तसेच मोठ्या संख्येने पारंपरिक क्रीडा प्रेमी उपस्थित होते.

महाराष्ट्राला पारंपरिक खेळांची मोठी परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्वतः तलवार युद्ध, घोडेस्वारी, भालाफेक व इतर क्रीडा प्रकारांमध्ये निपुण होते. छत्रपती शाहू महाराजांनी कुस्तीला चालना दिली. महाराष्ट्राच्या खाशाबा जाधव यांनी देशाला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिले असे सांगून पारंपरिक क्रीडा प्रकारांसाठी स्वतंत्र महोत्सव सुरु केल्याबद्दल राज्यपालांनी राज्य शासन, महानगर पालिका व क्रीडा भारतीचे अभिनंदन केले.

आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करताना मातृभाषा व मातृभूमी यांसह स्वदेशी खेळांना प्रोत्साहन द्यावे लागेल असे सांगून, कुलपती या नात्याने राज्यातील विद्यापीठांना पारंपरिक खेळांना चालना देण्याची आपण सूचना करु, असे राज्यपालांनी सांगितले.

आज लहानांपासून मोठ्यांपर्यंत लोक मोबाईल फोनचा अति वापर करताना दिसतात. समाजात मादक पदार्थांचा विळखा वाढत आहे. अश्यावेळी युवकांना पारंपरिक तसेच आधुनिक खेळांकडे प्रयत्नपूर्वक वळवले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

मराठमोळ्या खेळांचा समावेश असलेला पारंपरिक क्रीडा महाकुंभ आयोजित केल्याबद्दल मंत्री मंगल प्रभात लोढा व क्रीडा भारती यांचे अभिनंदन करून लगोरी, फुगडी, कबड्डी, दोरीच्या उड्या हे पारंपरिक खेळ पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पारंपरिक क्रीडा महाकुंभाचे आयोजन केले जाईल व त्यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद केली जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. या स्पर्धांमधील विजेत्यांना चांगली बक्षिसे दिली जातील तसेच या स्पर्धांसोबत गडकिल्ल्यांचे प्रदर्शन देखील भरवले जाईल असे त्यांनी सांगितले.

सुरुवातीला लेझीमच्या गजरात राज्यपालांनी मशाल पेटवून महाकुंभाचे उदघाटन केले. राज्यपालांसमोर तलवारबाजी व दांडपट्ट्याची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

महाकुंभाचे आयोजन महाराष्ट्र शासन, बृहन्मुंबई महानगर पालिका व क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. दिनांक २६ जानेवारी ते १९ फेब्रुवारी या कालावधीत पारंपरिक क्रीडा स्पर्धा होणार आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वत:मधील देशभक्त जागविण्याचा संकल्प करूया ! - ना.सुधीर मुनगंटीवार

Sat Jan 27 , 2024
– प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम – विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सन्मान चंद्रपूर :- भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष आजपासून सुरू झाले आहे. संविधानाने आपल्याचा जसे अधिकार दिले, तसेच कर्तव्य आणि दायित्वाचीसुध्दा जाणीव करून दिली आहे. या देशासाठी प्राणाची आहुती देऊन स्वातंत्र्याचा मंगलकलश ज्यांनी आपल्या हाती दिला आहे, त्या शहिदांचे स्मरण करून देशाला व लोकशाहीला पुढे नेण्यासाठी स्वत:मधील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com