– ८४३ भिक्षेकरी समाजाच्या मुख्य प्रवाहात : ‘स्माईल’ प्रकल्पातून बेघरांना दिलासा
नागपूर :- थंडीचा पारा दिवसेंदिवस घसरत आहे. अशा स्थितीत रस्त्यालगत, फूटपाथवर राहणाऱ्या भिक्षेकरी, बेघरांचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी नागपूर महानगरपालिका सरसावली आहे. नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून रस्त्यालगत, मोकळ्या ठिकाणी, फूटपाथवर राहणाऱ्या भिक्षेकरू, बेघरांची व्यवस्था ‘बेघर निवारा केंद्रां’मध्ये करण्यात येत आहे. या निवारा केंद्रांच्या माध्यमातून बेघरांना निवाऱ्यासोबतच औषधोपचार आणि व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणले जात आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनात शहरातील विविध भागातील बेघर निवारा केंद्रांच्या माध्यमातून आतापर्यंत ८४३ भिक्षेकऱ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करण्यात यश आले आहे.
मनपाद्वारे शहरातील भिक्षेकरी व रस्त्यावर राहणाऱ्या तसेच फुटपाथवर झोपणाऱ्या बेघरांना शोधून त्यांना मनपाच्या निवाऱ्यांमध्ये नेण्यात येत आहे. सदर शोध मोहिम सामाजिक सुरक्षा पथक, पोलिस सोबत मिळून राबविण्यात येत आहे. नागपूर शहरातील मिठा नीम दर्गा, संविधान चौक, रेल्वे स्थानक परिसर, सीए रोड, मेयो हॉस्पिटल, अग्रेसन चौक, धार्मिक स्थळे अशा विविध भागांमधून सोमवारी (ता.१६) १९ निराश्रीत बेघर आणि भिक्षेकरींना शोधून मनपाच्या निवारागृहात आणून आश्रय देण्यात आले आहे. महापालिकेच्या वाहनांतून व पोलीस सामाजिक सुरक्षा विभागाचे वाहनातून बेघर निवाऱ्यापर्यंत सोडण्याची सोय करण्यात आली आहे. निवारागृहात पाणी, स्वच्छतागृह, गादी, चादर, कपडे, सुरक्षा, भोजन आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. लाभार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे व आवश्यक तो औषधोपचार करण्यात येत आहे. यामुळे बेघर व निराधारांना मनपा निवारा केंद्राचा मोठा आधार मिळत आहे.
केंद्र शासनाच्या ‘स्माईल’ (SMILE) या प्रकल्पाद्वारे नागपूर महानगरपालिकेद्वारे बेघर निवारा केंद्र शहरातील विविध भागांमध्ये चालविण्यात येत आहेत. शहरातील विविध भागामध्ये कार्यरत बेघर निवारा केंद्रामध्ये सध्या १३८ भिक्षेकरी लाभ घेत आहेत. नागपूर महानगरपालिकेद्वारे भिक्षेकरी सर्वेक्षण करण्यात आले होते. या अंतर्गत जवळपास १६९१ भिक्षेकऱ्यांचे सर्व्हेक्षण करण्यात आले होते. भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय सामाजिक न्याय व अधिकारिता विभाग यांच्यामार्फत भिक्षेकरी लाभार्थ्यांचे पुनर्वसन करण्याबाबत राष्ट्रीय स्तरावर मोहीम राबविण्याकरिता दिल्ली, कोलकत्ता, मुंबई, चेन्नई, बेंगलुरु, हैद्राबाद, नागपूर, पटना, लखनऊ व इंदोर अशा १० शहरांची निवड करण्यात आली होती. त्यानुसार २३ फेब्रुवारी २०२१ ला नागपूर शहरातील भिक्षेकऱ्यांचे सर्व्हेक्षणाचे काम हातात घेण्यात आले होते. हे सर्वेक्षण जिओ टॅग, बायो-मॅट्रिक थंब इंप्रेशन द्वारे करण्यात आले.
मनपाद्वारे निर्माण करण्यात आलेल्या बेघर निवारा गृहाच्या संचालनासाठी ई-निविदा प्रक्रियेतून संस्थांची निवड करण्यात आली आहे. सह्याद्री ग्रामीण विकास बहुउद्देशीय युवक कल्याण संस्था नागपूर, संस्कृती महिला व बालविकास बहुउद्देशीय संस्था मनिष नगर, वैष्णवी बहुउद्देशीय शिक्षण संस्था नागपूर, परमात्मा एक बहुउद्देशीय शिक्षण संस्था तांडापेठ या संस्थांद्वारे निवारागृहाची जबाबदारी सांभाळण्यात येत आहे. सर्व संस्थाच्या बेघर निवारागृहांची एकूण क्षमता ही एकूण ४३० आहे. मनपाद्वारे २८ जानेवारी २०२२ रोजी सर्वप्रथम सह्याद्री ग्रामीण विकास बहुउद्देशीय युवक कल्याण संस्थाची निवड करण्यात आली. या संस्थेद्वारे १५० पुरूष भिक्षेकरी क्षमतेचे निवारागृह संचालनाची जबाबदारी सोपविण्यात आली. पुढे केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता विभाग यांच्यामार्फत ‘स्माईल’ (SMILE) या प्रकल्पाची सुरूवात करण्यात आली. त्याअंतर्गत नागपूर शहरामध्ये प्रभावी अंमलबजावणी करून ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत ९८१ भिक्षेकरी लाभार्थ्यांना निवारागृहाचा लाभ देण्यात आला. त्यामाध्यमातून मोठ्या संख्येत भिक्षेकरी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात यश आले, अशी माहिती समाज विकास विभागाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांनी दिली आहे.