– गुन्हे शाखेची कारवाई : विक्रीचा सुळसळाट वाढला
नागपूर :-शहर ड्रग्जच्या विळख्यात ढकलले जात आहे. छुप्या मार्गाने होणा-या नशेच्या विक्रीने तरुणाई भरडली जात आहे. गुरूवारी एका विक्रेता ११ लाख ७ हजार २०० रुपयांच्या ड्रग्जसह गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या हाती लागल्याने ड्रग्ज विक्रीचा सुळसुळाट वाढला की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सूरज प्रमोद गजभिये (३४, रा. अर्चना रेसीडन्सी, प्लॉट नंबर ६, गोपालकृष्णनगर, नंदनवन) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
गुन्हे शाखेच्या पथकाला ड्रग्ज विक्री संदर्भात माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मध्यरात्रीनंतर १.४५ ते पहाटे ४.२५ वाजतापर्यंत सापळा रचला होता. पोलिस पाळत ठेऊन असताना गोपालकृष्णनगर मार्गावर त्यांनी सूरजची दुचाकी थांबविली. त्याची अंगझडती घेतली. त्याच्याजवळ ११ लाख ७ हजार २०० रुपयांचे ११० ग्रॅम ७२ मिली गॅ्रम एम.डी. पावडर मिळाले. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी ड्रग्ज पावडर तसेच एक मोबाईल, मोपेड, व ईलेक्ट्रॉनिक वजनकाटा असा असा एकूण १२ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तो एकटाच या व्यवसायत असने शक्य नसल्याने पोलिसांनी त्यांची अधिक विचारपूस केली. त्याने पंकज साठवणे (रा. सोमवारी क्वॉर्टर, सक्करदरा) याच्या मदतीतून अंमली पदार्थांची खरेदी व विक्री करत असल्याचे सांगितले. सूरज गजभिये विरूद्ध पोलिसांनी कलम ८ (क), २२ (ब) २९ एन. डी.पी.एस. अॅक्ट अन्वये गुनहा दाखल करत अटक केली. जप्त मुद्देमालासह त्याला नंदनवन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिस आरोपी पंकज साठवणेचा शोध घेत आहेत. ही कारवाई पोलिस आयुक्त, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) पोलिस उप आयुक्त (डिटेक्शन) सहा. पोलिस आयुक्त (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या अंमली विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक गजानन गुल्हाने, सफौ. सिध्दार्थ पाटील, पोलिस हवालदार विवेक अढाऊ, मनोज नेवारे, नितीन साळुंके, पोलिस अंमलदार रोहीत काळे, सुभाष गजभिये व अनूप यादव यांनी केली.