चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे ईरई धरण,ईरई नदी, तुकूम रामनगर जलशुद्धीकरण केंद्र व बाबूपेठ येथुन पाणी उचल तथा पाणी पुरवठा करण्याकरीता असलेले पंप, मशिनरी इत्यादी चालविण्यासाठी कंत्राट देण्याच्या कामाची निविदा मागविण्यात आलेली आहे. ज्यामध्ये कंत्राटदारास फक्त वर उल्लेखीत जागेवरील पंप, मशिनरी चालविण्याकरीता कंत्राट देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त इतर कोणतेही हक्क कंत्राटदारास देण्यात येणार नाही.परंतु काही वृत्तपत्रामध्ये शहराच्या पाणी पुरवठा योजनेचे पूर्णतः खाजगीकरण करण्यात येत असल्याचे चुकीचे प्रकाशित झालेले आहे.
चंद्रपूर शहर पाणी पुरवठा योजना नोव्हेंबर २०१९ पर्यंत पुर्णतः खाजगीतत्वावर चालविण्यात येत होती,ज्यामध्ये शहराची पाणी पुरवठा योजना चालविणे देखभाल दुरुस्ती,वीज देयक भरणा करणे,रसायने, योजना चालविण्याकरीता मनुष्यबळ तसेच आवश्यक सर्व बाबी अंतर्भूत होत्या. त्याकरीता येणारा सर्व खर्च हा पाणीकर व नवीन नळजोडणीद्वारे भागवायचा होता,यात सर्व हक्क कंत्राटदारास देण्यात आलेले होते. परंतु योजना योगरित्या न चालविल्यामुळे खाजगीकरणाचा कंत्राट सन २०१९ मध्ये रद्द करण्यात आला व पाणी पुरवठा योजना महानगरपालिकेने आपल्या हाती घेतली. शहराची पाणी पुरवठा योजना मनपाने आपल्या हाती घेतल्यानंतर महानगरपालिकेकडे आवश्यक मनुष्यबळ नसल्यामुळे मनुष्यबळ पुरवठा करीता कंत्राटी नेमणूकीद्वारे आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येत आहे.
२०१९ पासुन या पद्धतीनेच पाणीपुरवठा योजना मनपा चालवित आहे. पाणी पुरवठा करीता लागणारी आवश्यक रसायने,वीज देयक,पाणी कराची वसुली,देखभाल दुरुस्ती शहरातील पाणी पुरवठा इत्यादी सर्व कामे ही महानगरपालिकेद्वारेच करण्यात येणार आहे. त्यामुळे खाजगीकरण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जिल्हा परिषदा,इतर मनपा,नगरपालिका तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सुद्धा याचप्रमाणे कंत्राटी सेवा पुरवठा तत्वावर पाणी पुरवठा योजना चालवतात तीच पद्धत या निविदा प्रक्रियेत स्वीकारण्यात आली आहे.
त्यामुळे सदर योजनेचे खाजगीकरण करण्यात येत नसून फक्त ईरई धरण,ईरई नदी, तुकूम रामनगर जलशुद्धीकरण केंद्र व बाबूपेठ संपवेल येथील फक्त मशिनरी चालविणे करीता सर्विस बेस ( सेवा पुरवठा ) वर्क कॉन्ट्रॅक्ट तत्वावर निविदा मागविण्यात आलेली आहे.