– केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार उद्घाटन
नागपूर :- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानच्या वतीने उद्यापासून (दि. १९ जानेवारी २०२४) तीन दिवसीय ‘खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. रेशीमबाग येथील कवीवर्य सुरेश भट सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल.
उद्घाटन सोहळ्याला ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते दत्ता मेघे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. उद्घाटन सोहळ्यानंतर लगेच सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळे यांचा भावगीतांचा कार्यक्रम होईल. २१ जानेवारीपर्यंत होणाऱ्या या महोत्सवात दररोज पाच कर्तृत्ववान ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार होणार आहे. तिन्ही दिवसांसाठी निःशुल्क प्रवेशिका उपलब्ध असून त्यासाठी केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या खामला चौकातील जनसंपर्क कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी १ या कालावधीत प्रत्यक्ष संपर्क साधायचा आहे. सभागृहात प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर आसन व्यवस्था असणार आहे. ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने तिन्ही दिवस महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रा. अनिल सोले, सचिव डॉ. राजू मिश्रा, कोषाध्यक्ष अशोक मानकर, विश्वस्त प्रभाकर येवले, प्रतापसिंह चव्हाण, गोपाल बोहरे, नारायण समर्थ, बाळ कुळकर्णी, अविनाश घुशे, डॉ. संजय उगेमुगे, गौरी चांद्रायण आणि महमूद अंसारी यांनी केले आहे.
तीन दिवस मेजवानी
*१९ जानेवारी (शुक्रवार)* : सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळे यांचा भावगीतांचा कार्यक्रम.
*२० जानेवारी (शनिवार)* : कोकण कन्या बॅण्डचा ‘लाईव्ह कॉन्सर्ट’. जुनी हिंदी-मराठी गाणी नवीन पद्धतीने सादर केली जातील.
*२१ जानेवारी (रविवार)* : आंतरराष्ट्रीय अभिनेते शेखर सेन यांचा ‘तुलसी’ हा एकपात्री नाट्याविष्कार.