संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-190 पोलीस पाटलांची पदे मंजूर,145 पदे अजूनही रिक्त
कामठी :- गाव पातळीवर छोट्या मोठ्या कारणावरून निर्माण होणाऱ्या तंट्याचे पर्यवसन मोठ्या तंट्यात होऊ नये ,वादामध्ये अडकून पडून त्यातून आर्थिक नुकसान होऊ नये ,कुटुंबाची, समाजाची व गावाची शांतता धोक्यात येऊ नये यादृष्टीने गावात तंटे निर्माण होणार नाहीत व अस्तित्वात असलेले तंटे लोकसहभागातून समोपचाराने आणि आवश्यक तेथे प्रशासनाची मदत घेऊन तंटे सोडविण्याची व्यवस्था निर्माण व्हावी यासाठी शासनाने सन 2007 पासून ‘महात्मा गांधी तंटामुक्त गाव’मोहिम सुरू केली.या पाश्वरभूमीवर कामठी -मौदा उपविभागीय परिसरातील गावात तंटामुक्त समिती नेमण्यात आली.या समितीत गावातील नेमलेला पोलीस पाटील हा समितीचा निमंत्रक पदी असून अधिक महत्त्वाचे पद आहे. त्यानुसार कामठी मौदा उपविभागीय गावात 190 पोलीस पाटलांची पदे मंजूर असून फक्त 45 पोलीस पाटील कार्यान्वीत आहेत तर 145 पदे हे विविध कारणास्तव रिक्त झाले असले तरी या 145 पोलीस पाटलांच्या रिक्त पदाचा भरणा अजूनही करण्यात आलेले नाही.
स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी तालुक्यातील काही गावापैकी फक्त आजनी गावात बळवंतराव रडके म्हणून पोलीस पाटील पदी कार्यरत आहेत तर भोवरी पासून गुमथळा मार्गे मौदा गाव हे मौदा (ग्रामीण)पोलीस विभागात कार्यरत आहे.कामठीतील काही गावे शहर पोलीस आयुक्तलयात समावेश झाल्याने बहुतांश गावी रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदाकडे अक्षम्य दुर्लक्ष पुरविण्यात आले तसेच तंटामुक्त गाव समिती सुदधा दुर्लक्षित आहे.
पोलीस पाटील हे अतिशय महत्वाचे पद असून पोलीस पाटलाला शासनाकडून प्रति महिना मानधन स्वरूपात प्राप्त होतो.कामठी तालुक्यातील आवंढी गावातील पोलीस पाटील पद हे 30 जून 2012 पासून सेवानिवृत्त झाल्याने अजूनही रिक्त आहे. नेरी गावातील पोलीस पाटील 30 मे 2006 ला मृत्यू पावल्याने रिक्त आहे. लिहिगाव येथील 30 जुलै 2008 पासून सेवानीवृत्तीमुळे रिक्त आहे. शिरपूर येथील 30 जून 2009 पासून सेवानिवृत्ती मुले रिक्त आहे त्याचप्रमाने खैरी येथील पोलीस पाटील पद हे 30 जून 2005 पासून मृत्यू कारणामुळे पोलीस पाटलाचे पद रिक्त आहे. यानुसार सद्यस्थितीत एकूण 190 पोलीस पाटील पैकी फक्त 45 पद कार्यरत असून 145 पोलीस पाटील पद रिक्त आहेत. तेव्हा आगामी निवडणुका लक्षात घेता रिक्त पोलीस पाटलांची पदे त्वरित भरण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे.