मुंबई :- लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात मतदान होत असल्याने येथे भाजपाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार येत्या 10 एप्रिलला नरेंद्र मोदी रामटेक येथे पहिली जाहीर सभा घेणार आहेत.
त्यानंतर 14 एप्रिलला दीक्षाभूमी येथे दर्शन आणि चंद्रपूर येथे जाहीर सभा प्रस्तावित आहे, तर शाह यांची 5 किंवा 6 एप्रिल रोजी विदर्भात पहिली सभा होणार आहे. याशिवाय राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि अन्य शीर्षस्थ नेत्यांच्या सभांचेही वेळापत्रक लवकरच जाहीर होईल, अशी माहिती भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी मंगळवारी दिली.
प्रचाराची आखणी
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची आखणी करण्यासाठी भाजपाच्या निवडणूक व्यवस्थापन समितीची बैठक मंगळवारी प्रभारी डॉ. दिनेश शर्मा यांच्या उपस्थितीत पार पडली. महाराष्ट्रात निवडणुकीच्या दृष्टीने व्यूहरचना काय आहे, कशा प्रकारची व्यवस्था, यंत्रणा उभी आहे. या यंत्रणेची अंमलबजावणी नेमकी कशा पद्धतीने होते आहे याचा आढावा आणि मार्गदर्शक सूचना डॉ. शर्मा यांच्या माध्यमातून देण्यात आल्या. व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून प्रत्येकावर जबाबदारी देण्यात आली आहे.