आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून महसूल अधिकाऱ्यांनी जलद सेवा द्याव्यात – निरंजन सुधांशू

दोन दिवसीय विभागीय महसूल परिषदेचे उद्घाटन

महसूल विषयक कामकाजावर होणार मंथन

नागपूर : आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे प्रशासकीय कामकाज गतिमान होत आहे. त्यामुळे महसूल अधिकाऱ्यांनी हे तंत्रज्ञान आत्मसात करून सर्वसामान्य नागरिकांना जलद सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असे राज्याचे जमाबंदी आयुक्त तथा भूमी अभिलेख संचालक निरंजन सुधांशू यांनी सांगितले. वनामती सभागृहात आयोजित महसूल परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, नागपूरच्या जिल्हाधिकारी आर. विमला, वर्ध्याच्या जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, भंडाराचे जिल्हाधिकारी संदीप कदम, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीना, गोंदिया जिल्हा परीषेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यावेळी उपस्थित होते.

जमिनीच्या नोंदी, अभिलेख अचूक ठेवणे हे महसूल विभागाचे महत्वाचे काम आहे. इतर कामांमुळे याकडे दुर्लक्ष होणार नाही, यासाठी महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दक्ष राहावे, असे श्री. सुधांशू यावेळी म्हणाले. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे प्रशासकीय कामामध्ये अनेक चांगले बदल होत आहेत. लवकरच जमिनीच्या मोजणीसाठी रोव्हर मशीनचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे एक ते दोन दिवसांत होणारी जमीन मोजणी अवघ्या काही मिनिटात पूर्ण करणे शक्य होईल. पीक कर्ज अथवा इतर कर्जासाठी आवश्यक महसूल विभागाशी संबंधित अभिलेख बँकांना ऑनलाईन स्वरुपात उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा आहे. कोविडसारख्या असाधारण परिस्थितीमध्येही या विभागाने चांगले काम केले आहे. सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांशी संबंधित असलेल्या या विभागाचे कामकाज अधिक गतिमान होण्यासाठी, तसेच प्रत्यक्ष काम करताना येणाऱ्या अडचणींवर चर्चा करण्यासाठी महसूल परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रशासकीय कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर, जमीन महसूल विषयक कायदे आदी बाबींवर मार्गदर्शन केले जाणार असून त्यामुळे महसूल विभागातील अधिकाऱ्यांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होईल, असे विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी सांगितले.

राज्यस्तरीय महसूल परिषदेच्या धर्तीवर विभागस्तरावर महसूल परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यामाध्यमातून महसूल प्रशासनाशी संबंधित महत्वाच्या कायद्यांवर मार्गदर्शन केले जाणार असल्याने कामकाज अधिकाधिक अचूक आणि गतिमान होण्यासाठी मदत होईल. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कमी कालावधीत चांगल्या सेवा मिळतील, असे महसूल उपायुक्त मिलिंदकुमार साळवे यांनी प्रास्ताविकामध्ये सांगितले.

उद्घाटनसत्राचे संचालन सामान्य प्रशासन उपायुक्त आशा पठाण यांनी केले. या महसूल परिषदेला नागपूर विभागातील अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार उपस्थित आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

क्षयमूक्त जिल्ह्यासाठी कर्मचाऱ्यांनी रुग्णापर्यंत पोहचण्याचा संकल्प करावा - डॉ. रुडे

Sat Mar 26 , 2022
जिल्हा सामान्य रुग्णालयात जागतिक क्षयरोग दिन साजरा गडचिरोली,(जिमाका): जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था अंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये जागतिक क्षयरोग दिन 24 मार्च 2022 ला साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. अनिल रुडे जिल्हा शल्यचिकित्सक जि.सा.रु., कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. साळुंखे अतिरीक्त जिल्हा शल्यचिकित्सक जि.सा.रु., डॉ. दावल साळवे जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प. गडचिरोली, डॉ. नागदेवते, डॉ. मनिष मेश्राम, डॉ. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com