खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी उंचावण्यासाठी ‘मिशन लक्ष्यवेध’ राबवणार – मंत्री संजय बनसोडे

नागपूर :- राज्यातील खेळाडूंची कामगिरी सातत्याने उंचावण्यासाठी योजनाबद्ध कृती कार्यक्रम क्रीडा विभागाने हाती घेतला आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा व खेलो इंडिया, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत खेळाडूंना केंद्रबिंदु मानून खेळाडू व स्पर्धा केंद्रीत “मिशन लक्ष्यवेध” आराखडा तयार करण्यात आला आहे. मंत्रीमंडळाने क्रीडा विभागाच्या प्रस्तावाला मान्यता दिली असून मिशन लक्ष्यवेध ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येणार आहे, असे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

नागपूर येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.क्रीडा क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी करणा-या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थेशी करार करण्यात येणार असून या योजनेच्या सनियंत्रणासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे रुपांतर महाराष्ट्र क्रीडा प्राधिकरण करण्यात येणार आहे, असे क्रीडा मंत्री संजय बनसोडे म्हणाले.

*मिशन लक्ष्यवेध*

प्रथम टप्प्यात १२ खेळ निश्चित केले असून यामध्ये ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, हॉकी, कुस्ती, आर्चरी, शुटींग, रोईंग, सेलिंग, लॉन टेनिस व टेबल टेनिस या खेळांचा समावेश आहे. या खेळांची हाय परफॉर्मन्स सेंटर राज्यात विविध ठिकाणी सुरु करण्यात येणार आहे. तसेच विभागीस्तरावर ३७ स्पोर्टस एक्सलन्स सेंटर व जिल्हास्तरावर १३८ क्रीडा प्रतिभा विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहेत. जिल्हा विकास आराखडा तयार करुन १० टक्के निधी क्रीडा विकास आराखड्यासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात अत्याधुनिक सुसज्य असे स्पोर्टस सायन्स सेंटर स्थापन करण्यात येणार आहे. तसेच विभागीय व जिल्हास्तरावर खेळाडूंसाठी समुपदेशन केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. त्याद्वारे खेळाडूंना करिअरच्या संधीची माहिती दिली जाणार आहे.

*मिशन लक्ष्यवेधसाठी १६० कोटी निधी*

निवडलेल्या १२ खेळ प्रकाराच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. १६० कोटी इतका निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे. तसेच प्रशिक्षण केंद्र व इतर सुविधांकरिता जिल्हा स्तरावर अंदाजे ५५ कोटी, विभागीय स्तरावर ५५ कोटी आणि राज्य स्तरावर ५० कोटी खर्च अपेक्षित आहे.

*३७४० खेळाडूंच्या अद्यावत क्रीडा प्रशिक्षणाची व्यवस्था*

जिल्हास्तरावर १३८ क्रीडा प्रतिभा विकास केंद्रांची स्थापना करण्यात येईल. त्याचबरोबर विभागीय मुख्यालयाचे ठिकाणी उपरोक्त निकषानुसार एकूण ३७ स्पोर्टस एक्सलन्स सेंटरची स्थापना करण्यात येईल. त्याचप्रमाणे राज्यस्तरावर १२ हाय परफॉर्मन्स सेंटरची स्थापना करण्यात येईल. या माध्यमातून जिल्हास्तरावर २७६०, विभागीय स्तरावर ७४० आणि राज्यस्तरावर २४० अशा एकूण ३७४० खेळाडूंच्या अद्यावत क्रीडा प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यातील पोलीस प्रशिक्षण क्षमता दुपटीने वाढविणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Sat Dec 16 , 2023
नागपूर :- राज्यात सर्वात मोठी २३ हजार पोलिसांची भरती करण्यात आली आहे. राज्याची पोलीस प्रशिक्षण क्षमता ही ८ हजार आहे. ही क्षमता कमी असल्यामुळे तुकडीनिहाय प्रशिक्षण देण्यात येते. राज्यात सध्या असलेल्या पोलीस प्रशिक्षण क्षमतेमध्ये दुपटीने वाढ करण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याप्रकरणी सदस्य रवींद्र वायकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. उपमुख्यमंत्री […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com