नागपूर : नागपूर शहरातील सेंट्रल एव्हेन्यू मार्गावरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकामधील मेट्रो स्टेशनला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आलेले आहे. मात्र या स्टेशनवर केवळ ‘आंबेडकर चौक’ असा उल्लेख असलेला फलक असून तो फलक तात्काळरित्या बदलवून येथे ‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक’ असे सुधारित नामफलक लावण्यात यावे, अशी मागणी करणारे पत्र भाजपा प्रदेश सचिव तथा नगरसेवक ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दीक्षित यांना दिले.
ते पत्रात म्हणाले, नागपूर शहरातील विविध भागामध्ये मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे कार्य उत्तमरित्या सुरू असून शहरातील काही मेट्रो स्टेशनला महापुरूषांचे नाव देण्यात येत असल्याची बाब आनंददायी आहे. सेंट्रल एव्हेन्यू मार्गावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील मेट्रो स्टेशनला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात आलेले आहे ही आंबेडकरी समुदायासाठी अभिमानास्पद बाब आहे. मात्र या स्टेशनवर ‘आंबेडकर चौक’ असे नामफलक प्रदर्शित करण्यात आलेले आहे. मेट्रो स्टेशनवर बाबासाहेबांचा एकेरी स्वरूपात नामोल्लेख ही आंबेडकरी समुदायाच्या भावना दुखावणारी बाब आहे. त्यामुळे या नामफलकामध्ये तात्काळ दुरूस्ती करून ‘आंबेडकर चौक’ या ऐवजी या स्टेशनवर ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक’ असे सुधारित नामफलक लावण्यात यावे, अशी मागणी ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी पत्राद्वारे केली आहे.