-स्थानिक स्वराज्य संस्थेतर्फे ‘हितगुज’ कार्यक्रमात माधुरी साकुळकर यांचे प्रतिपादन
नागपूर. मुलीच्या लग्नाचे वय 21 करण्याच्या विधेयकाला मंजुरी देण्यात आली. याच सूत्राला धरून आज लग्नाचे वय या विषयावर संस्थेने हितगुज या सदराखाली कार्यक्रम आयोजित केला होता. आजच्या युगात मुलीचा लग्नाचा विचार करताना तिची मानसिक तयारी, शरिराची प्रगल्भता बघूनच मुलींच्या लग्नाचा विचार करावा, असे प्रतिपादन स्त्री चळवळीच्या कार्यकर्त्या माधुरी साकुळकर यांनी यावेळी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करतांना केले.
अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था नागपूर येथील विभागीय कार्यालयामार्फत हितगुज या कार्यक्रमाअंतर्गत संस्थेद्वारे राबविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थींनीसाठी लग्नाचे वय या विषयावर ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी संस्थेचे विभागीय संचालक जयंत पाठक, प्रशासकीय अधिकारी राही बापट प्रामुख्याने उपस्थित होत्या.
मुलीच्या लग्नाचे वय हा मुद्दा आजच्या समाजात अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. याला इतिहास आहे. मुलीच्या लग्नाचा कायदा पहिल्यांदा 1860 मध्ये करण्यात आला. त्यांनतर त्यामध्ये सातत्याने बदल करण्यात आले. पहिल्याच्या काळी मुलीचे लग्न लवकर होत होते. त्यामागील कारणेही वेगळी होती. परंतु, सध्याच्या काळात मुलीची मानसिक तयारी, शरीराची प्रगल्भता ठरवूनच मुलीने लग्नाचा विचार करावा, असेही श्रीमती साकुळकर म्हणाल्या. मुलीचे वय 18 वर्षे पुर्ण झाल्यानंतर तिचा गर्भ परिपक्व होऊन ती दुसऱ्या जीवास जन्म देण्यास तयार होते. त्यामुळे तिच्या लग्नाचा विचार करताना तिच्या शारिरिक आरोग्याचा विचारही करणे गरजेचे आहे.
आजकाल मुलीवर अत्याचार, लैंगिक शोषण, बलात्कार या सारख्या गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. मुलीवरील अत्याचाराच्या बातम्या आपण रोज वाचत असतो. त्यासाठी मुलींनी माझी सुरक्षा, माझी जबाबदारी हे ब्रीद स्वीकारून पुढे आले पाहिजे. स्त्री व महिला सबलीकरणाचे धोरण राबविले पाहिजे. आपल्या परिसरात मुलींसाठी व महिलांसाठी धोकादायक ठिकाण हेरून त्याठिकाणी व्हिलेज ऑडिट केले पाहिजे. अशा ठिकाणी पोलिसांच्या गस्त, कॅमेरे यासारख्या गोष्टींचा वापर करून होणारे अपराध रोखले पाहिजेत, असेही माधुरी साकुळकर यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय संचालक जयंत पाठक यांनी केले तर संचालन व आभारप्रदर्शन प्रशासकीय अधिकारी राही बापट यांनी केले. या कार्यक्रमाला विविध अभ्यासक्रमातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निशा व्यवहारे, मंजिरी जावडेकर यांनी प्रयत्न केले.