नागपूर :- विदर्भात पाऊस, ढगाळ वातावरण जास्त आर्दता व कमी तापमानामुळे सोयाबीन, कापूस व मूग पिकावर किड व रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता पाहता यास नियंत्रित करण्याकरिता शेतकऱ्यांना कृषी सहसंचालक कार्यालयाने नियमित सर्वेक्षण, व्यवस्थापन आदी उपाययोजना सूचविल्या आहेत.
कापूस पिकावर मावा, तूडतूडे आणि फुलकिडे या रसशोषक किडींचा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून प्रादुर्भाव आढळुन येतो. तसेच बोंडअळी, डोंबकळ्यास्वरुपात दिसून येतो. किडींचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने केल्यास नुकसान रोखता येते. यासाठी पिकामध्ये पिवळे चिकट सापळे लावून पांढरी माशीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवणे, चवळीच्या आंतरपिक घेणे, वेळेवर आंतरमशागत करुन पीक तन विरहीत ठेवणे आदी उपाययोजनांसह बुप्रोफेझीन २५ टक्के प्रवाही २० मिली किंवा फ्रीप्रोलीन ५ टक्के प्रवाही ३० मिली किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के यापैकी कोणत्याही एका किटनाशकाची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
नागपूर विभागात सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होते. या पिकावर केसाळ अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. यासाठी उपाययोजनेंतर्गत सुर्यफुल पीक घेतलेल्या ठिकाणी सोयाबीन पीक घेणे टाळावे, सापळा पीक म्हणून सुर्यफुलाची पेरणी करावी. शेतीचे बांध स्वच्छ ठेवावे, अळी-अंडी असलेली पाने नष्ट करावी, किडीचे रासायनिक नियंत्रण करतांना क्विनॉलफॉस २५ इसी ३० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणे आदी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
मूग पिकावर विषाणुजन्य रोगाचा दुय्यम प्रसार करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले आहे. या रोगामुळे रोगग्रस्त झाडाच्या पानावर खोलगट व उभारलेल्या भेगा दिसतात. झाडे खुजी व खुरटी राहतात. या रोगाचा प्रसार बियाणाद्वारे होत असल्यामुळे पेरणीकरिता रोग विरहीत बियाणाचा वापर करणे, शेत तनविरहीत ठेवणे, मूग पिकाबरोबर आंतरपीक म्हणून बाजरी, मका, ज्वारी ही आंतरपीक घेणे तसेच पीकात जास्त नत्रयुक्त खत देणे आदी उपाययोजना सूचविण्यात आल्या आहेत.
गोगलगाय या बहुभक्षी किडीचा प्रादुर्भाव खरिप हंगामात पेरणी आटोपल्यांनतर वेळीच करणे गरजेचे असते. याकरिता प्रार्दुभावग्रस्त भागात किडीचे नियमित सर्वेक्षण केल्यास होणारे नुकसान टाळता येते. या किडीचा प्रसार शेतामध्ये वापरात असणाऱ्या अवजारे, बैलगाडी, यंत्रसामग्री, ट्रॅक्टर, ट्रॉली तसेच अन्य साधनांमधून होतो. या किडीमुळे सर्व प्रकारच्या पालेभाज्यांना नुकसान होते. या किडीच्या व्यवस्थापानाकरिता शेतकऱ्यांनी वेळोवेळी शेतात स्वच्छता मोहीम हाती घ्यावी तसेच किडीच्या लपण्याच्या जागा शेाधून त्या स्वच्छ व सपाट कराव्यात, आणि तुषार सिंचनाऐवजी ठिबक सिंचनाचा वापर करावा. आदी उपाययोजना सूचविण्यात आल्या आहेत.
हुमणी बहूभक्षीय किडीच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन , कापूस, तूर या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता पाऊस पडल्यावर असते. जैविक मित्र बुरशी मेटॅरायझियम ४ मिली प्रतिलिटर पाण्यात मिसळून पिकाच्या मुळाशी आळवणी करण्याचे किंवा मेटॅरायझियम १ किलो प्रति १०० किलो शेणखतात फेकणे आदी उपाययोजना सूचविण्यात आल्या आहेत.