मनपा मुख्यालयात गोवर संसर्ग आढावा बैठक

नागपूर : नागपूर शहरात गोवरच्या (मीझल्स) वाढत्या संसर्गाच्या अनुषंगाने नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयातील आयुक्त सभाकक्षात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सांगितले की, गोवरच्या संसर्गापासून बचावासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण अत्यंत आवश्यक असून मनपाद्वारे राबविण्यात येत असलेल्या लसीकरण मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करावे व बालकांना गोवर सदृश्य कुठलीही लक्षणे आढळल्यास त्वरीत जवळच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाउन नि:शुल्क उपचार करावे.            या आढावा सभेत मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेन्द्र बहिरवार, साथरोग नोडल अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे, जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद साजीद, डॉ. सरला लाड लसीकरण अधिकारी यांच्यासह सर्व झोनल वैद्यकीय अधिकारी व संबंधित विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

राज्यातील अनेक शहरांमध्ये गोवर संसर्गाचा धोका वाढत असताना नागपूर महानगरपालिकेतर्फे संपूर्ण शहरात ९ महिने ते ५ वर्ष बालकांच्या लसीकरणावर भर दिला व त्यासाठी विशेष लसीकरण मोहिम सुद्धा राबविली. गोवरच्या संसर्गापासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी मनपाद्वारे वेळोवेळी पाउल उचलण्यात आले. मात्र अफवा आणि संभ्रमामुळे अनेक पालकांनी बालकांच्या लसीकरणासाठी पुढाकार न घेतल्यामुळे शहरात हळुहळु गोवरच्या संसर्गाचा धोका वाढू लागला आहे. त्यामुळे यावर उपाययोजना म्हणून अद्यापही ज्या बालकांचे लसीकरण झालेले नाही. त्यांनी त्वरीत आपल्या नजीकच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामधून आपल्या बाळाचे लसीकरण करून घेणे अत्यावश्यक असल्याचे अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, नागपूर शहरात गोवर (मीझल्स) संसर्गाचा धोका वाढत असून दीड महिन्यात शहरात गोवरच्या ३१ रुग्णांची नोंद झाली आहे. याशिवाय २ रुग्ण रूबेलाचे सुद्धा आढळले आहेत. गोवरचे सर्वाधिक ११ रुग्ण गांधीबाग झोनमधील असून बाधित सर्व बालके मोमीनपूरा भागातील आहेत.

२०२३ वर्षात नागपूर शहरात ८२ संशयीत आढळले या सर्व संशयीतांची चाचणी केली असता त्यातून ३१ बालक गोवर तर २ बालक रुबेलाचे पॉझिटिव्ह निघाले. यामध्ये सर्वाधिक रुग्ण गांधीबाग झोनमधील ११, नेहरूनगर झोनमध्ये १०, आशीनगर झोनमध्ये ६, मंगळवारी झोनमध्ये २, लक्ष्मीनगर आणि धरमपेठ झोनमध्ये प्रत्येकी १ रुग्णाची नोंद झाली आहे.

मोमीनपुरा भागात गोवरचे 11 रुग्ण आढळल्यामुळे या भागातील 9 महिने ते 5 वर्ष वयोगटातील बालकांचे गोवर पासुन संरक्षण व्हावे म्हणून गोवर लसीचा एक अतिरिक्त डोज देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तरी या भागातील रहिवासी यांनी मोमीनपुरा नागरीक आरोग्य केन्द्रात जाऊन गोवर लसीचा अतिरिक्त डोज घ्यावा, असे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ. नरेन्द्र बहिरवार यांनी केले आहे.

गोवरचे रुग्ण असलेल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहिम राबविण्यात यावी. तसेच परिसरातील प्रभावी व्यक्ती, स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून नागरिकांना जागरूक करण्याबाबत बैठकीत अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी निर्देशित केले.

गोवरची लक्षणे

ताप, सर्दी, डोळे लाल होणे, खोकला अशी सुरूवातीची लक्षणे असतात. त्यानंतर पुरळ उठायला सुरवात होते, ती कपाळा पासून व नंतर मान व हातपाय पर्यंत पसरते. गोवर हा गंभीर आजार आहे कारण हा इतर आजारांना निमंत्रण देतो. लहान मुलांना खोकल्याचा त्रास सुरु होतो व त्यामुळे घशाला सूज येते निमोनिया होऊ शकतो. गोवर झाल्यानंतर अ जीवनसत्व कमी होते त्यामुळे डोळ्याचे आजार होतात काही वेळा अंधत्व पण येते. कुपोषित बालकास हा आजार होण्याची जास्त शक्यता असते

काळजी घ्या हे करू नका

गोवर झाल्यास बालकाला इतरांपासून वेगळे ठेवले पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी जाऊ देणे टाळा, बालकांना शाळेत पाठवू नये. कारण हा आजार अतिशय संसर्गजन्य आहे. ताबडतोब डॉक्टरांचा सल्ल्या घ्यावा , घरच्या घरी उपचार करू नये, कडू निंबाचा पाला किंवा इतर कोणतेही घरगुती उपचारात वेळ घालवू नये. सर्व डॉक्टरांनी गोवर सदृश लक्षणे असणाऱ्या सर्व बालकाची माहिती महानरपालिका आरोग्य विभागास देणे आवश्यक आहे.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अनिल देशमुख का काटोल में जंगी स्वागत

Sat Feb 18 , 2023
काटोल :-सुनी सुनाई बातों के आधार पर मुंबई के पुर्व सी पी परमवीर द्वारा 100 करोड़ रुपये की मांग की शिकायत पर ईडी-सीबीआई, आय टी, द्वारा 100 करोड़ रुपये की चल रही जांच के बाद ईडी-सी बी आय द्वारा पुख्ता सबूत ना देने से उच्च न्यायालय, द्वारा जमानत दिए जाने के बाद काटोल के विधायक तथा पूर्व गृहमंत्री अनिल देशमुख […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com