राज्यपाल रमेश बैस यांचा शपथविधी संपन्न; मराठीतून घेतली शपथ 

मुंबई :- झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली. शनिवारी (दि. १८) राजभवन मुंबई येथील दरबार हॉल येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांनी राज्यपालांना पदाची शपथ दिली. राज्यपालांनी मराठीतून शपथ घेतली.   

शपथविधीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.

सुरुवातीला मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी राज्यपालांच्या नियुक्तीबाबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढलेल्या अधिसूचनेचे वाचन केले. राष्ट्रगीताने शपथविधी सोहळ्याची सुरुवात व सांगता झाली. शपथविधी सोहळ्यानंतर भारतीय नौदलातर्फे राज्यपालांना मानवंदना देण्यात आली.

कार्यक्रमाला राज्यपालांच्या पत्नी रामबाई बैस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मंत्री मंगलप्रभात लोढा, विधान सभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, लोकायुक्त विद्यासागर कानडे, राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष न्या. (नि.) के के तातेड, लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे सचिव, वरिष्ठ पोलीस अधिकारी व निमंत्रित नागरिक उपस्थित होते.

महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांचा अल्प परिचय

दिनांक १८ फेब्रुवारी २०२३ रोजी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतलेले रमेश बैस पूर्वीचे मध्यप्रदेश व सध्याच्या छत्तीसगड राज्याच्या तसेच राष्ट्रीय राजकारणातील एक आदरणीय नाव आहे.

संसदीय राजकारण, समाजकारण तसेच संघटन कार्याचा तब्बल पाच दशकांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या रमेश बैस यांनी सार्वजनिक जीवनात नगरसेवक पदापासून केंद्रीय राज्यमंत्री व राज्यपाल पदापर्यंत विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडलेल्या आहेत.

दिनांक २ ऑगस्ट १९४७ रोजी रायपूर (छत्तीसगड) येथे जन्मलेले रमेश बैस यांचे शिक्षण रायपूर येथे झाले.   

सन १९७८ साली ते पहिल्यांदा रायपूर महानगर पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. सन १९८० ते १९८५ या कालावधीत ते मध्यप्रदेश विधान परिषदेचे सदस्य होते. याकाळात त्यांनी मध्यप्रदेश विधानमंडळाच्या अंदाजपत्रक समितीचे तसेच त्यानंतर ग्रंथालय समितीचे सदस्य म्हणून काम केले. सन १९८२ ते १९८८ या कालावधीत ते मध्यप्रदेश भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मंत्री देखील होते.

सन १९८९ साली बैस रायपूर येथून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर तब्बल सहा वेळा, म्हणजे एकूण सात वेळा लोकसभेवर निवडून जाण्याचा त्यांनी विक्रम केलेला आहे.

सन १९९८ साली पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात रमेश बैस यांची पोलाद व खाण मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली.

सन १९९९ ते २००४ या कालावधीत त्यांनी रसायने व खते व त्यानंतर माहिती व प्रसारण खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम पहिले.

सन २००३ साली रमेश बैस यांना केंद्रीय खाण मंत्रालयामध्ये राज्यमंत्री पदाचा स्वतंत्र कार्यभार देण्यात आला व त्यानंतर काही काळ ते केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयात राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) होते.

आपल्या प्रदीर्घ सांसदीय जीवनात बैस यांनी पेट्रोलियम व नैसर्गिक वायु विषयक संसदीय समिती, लोकलेखा समिती, ऊर्जा मंत्रालय सल्लागार समिती, कोळसा आणि खाण मंत्रालयाची हिंदी सल्लागार समिती, नियम समिती आदी समित्यांचे सदस्य म्हणूनही कामकाज पाहिलेले आहे.

सन २००९ ते २०१४ या काळात रमेश बैस भारतीय जनता पक्षाचे लोकसभेतील मुख्य प्रतोद होते. सन २०१४ ते २०१९ या काळात १६ व्या लोकसभेचे सदस्य असताना ते सामाजिक न्याय व सक्षमीकरण विषयावरील संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष होते. बैस यांनी दिव्यांग व्यक्ती तसेच तृतीयपंथी (ट्रान्सजेंडर )व्यक्ती अधिकार सुरक्षा विधेयका संदर्भात व्यापक संशोधन व अध्ययन केले आहे.

सन २०१९ साली रमेश बैस यांची राज्यपाल पदावर नियुक्ती करण्यात आली. दिनांक २९ जुलै २०१९ ते १३ जुलै २०२१ या काळात ते त्रिपुराचे राज्यपाल होते. त्यानंतर दिनांक १४ जुलै २०२१ रोजी त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी बदली करण्यात आली. दिनांक १८ फेब्रुवारी २०२३ रोजी  रमेश बैस यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून पदग्रहण केले.

राज्यपाल रमेश बैस यांना समाजसेवेची आवड असून त्यांनी अनेकदा आरोग्य शिबीरे, नेत्र तपासणी शिबीर, तसेच ग्रामीण भागांमध्ये क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे. श्री रमेश बैस यांनी छत्तीसगड धनुर्विद्या ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष म्हणून देखील काम केले आहे. मध्य प्रदेश बीज व कृषी विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केले आहे.

महाराष्ट्राला अशा प्रकारचे विविधांगी कार्यानुभव असलेले व्यक्तिमत्त्व राज्यपाल म्हणून लाभलेले आहे.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Ramesh Bais sworn in as new Governor of Maharashtra

Sat Feb 18 , 2023
Mumbai :-Jharkhand Governor Ramesh Bais took oath as the 20th Governor of Maharashtra at Raj Bhavan Mumbai on Sat (18th Feb) Acting Chief Justice of the Bombay High Court Justice Sanjay Gangapurwala administered the oath of office to Governor Ramesh Bais. Maharashtra Chief Minister Eknath Shinde congratulated the Governor by presenting a bouquet of flowers after the swearing in ceremony.  […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights