यवतमाळ :- महाराष्ट्रात आज श्री गणेश चतुर्थीनिमित्त सर्वत्र मंगलमूर्ती श्री गणेशाची स्थापना होत आहे. विघ्नहर्ता बाप्पाचे आगमन हे सर्वांना सुखावणारे आहे. आज विराजमान होत असलेल्या गणपती बाप्पाने सर्वांची मनोकामना पूर्ण करावी. सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंदाची कृपादृटी करावी, असे साकडे श्री चरणी घातल्याचे राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ-वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
पालकमंत्री संजय राठोड यांच्या निवासस्थानी आज श्री गणेशाची स्थापना करण्यात आली. यावेळी मंत्री संजय राठोड यांनी श्री गणेशाची विधीवत पूर्जा करून स्थापना केली. याप्रसंगी त्यांनी गणपतीच्या चरणी जनेतेसाठी मंगलकामना केली.
यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना, राज्यात लाडकी बहीण योजनेसह विविध घटकांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांचा सर्व स्तरातील नागरिकांना लाभ होत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यात राबविण्यात येत असलेल्या कल्याणकारी योजनांमुळे नागरिकांमधूनही समाधान व्यक्त होत आहे, असे ते म्हणाले. गेल्या आठवड्यात यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या पावसामुळे शेतातील कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश प्रशासनास दिल्याचेही पालकमंत्री संजय राठोड यांनी यावेळी सांगितले.
सुखकर्ता गणराया सर्वांच्या मनोकामना नक्कीच पूर्ण करेल, असा विश्वास यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केला. याप्रसंगी पालकमंत्री संजय राठोड यांच्या सहचारिणी शीतल राठोड, मुलगी दामिनी, मुलगा सोहम यांच्यासह कुटुंबीय, नातेवाईक, स्नेहीजन मोठ्या संख्येने उपस्थित होते.