-गावांना शेतांशी आणि शेतांना उद्योगाशी जोडा
नागपूर दि.27 : आपल्या गावाच्या परिसरातील शेतीचे सर्व रस्ते बारमाही करण्यासाठी, शेतातून मालवाहतूक करण्यासाठी, यांत्रिकीकरणाला पूरक कृषी उद्योग उभारण्यासाठी, मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजना एक संधी आहे, अधिकाधिक गावांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आज येथे केले.
ही योजना जिल्ह्याचा कायापालट करण्यास पूरक ठरू शकते. आज मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये ट्रॅक्टर पासून तर अन्य यंत्राचा वापर केला जात आहे. शेतापर्यंत सुलभतेने पोहोचणे आवश्यक आहे. याशिवाय शेतमालाला थेट शेतातून बाजारपेठेत नेण्यासाठी देखील चांगले रस्ते आवश्यक आहे. दिवसेंदिवस शेतीमध्ये मजूर मिळत नाही. या पुढच्या काळात शेती ही यांत्रिकीकरणातूनच केली जाणार आहे. त्यामुळे काळाची पावले ओळखून गावा गावातील सुज्ञ सरपंच लोकप्रतिनिधींनी आपापल्या गावाला या योजनेतून अधिकाअधिक पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे उभारावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आज या संदर्भात या रस्त्यांसाठी आवश्यक असणाऱ्या जिल्हास्तरीय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, रोहयोचे उपजिल्हाधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख अधिकारी, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विशेष प्रकल्प आदी सर्व अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
नागपूर जिल्ह्यामध्ये या योजनेतून मोठ्या प्रमाणात काम होणे अपेक्षित आहे. यासाठी प्रत्येक गावाकडून प्रस्ताव घेण्याबाबत बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले. ‘मी समृद्ध तर गाव समृद्ध ‘आणि ‘गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध’,ही या योजनेची मूळ कल्पना आहे. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून ही योजना राबविण्यात येत आहे. शेत रस्ते अन्य महामार्ग एवढेच महत्त्वाचे आहेत. शेतात पीक तयार होताच ते काढून योग्य ठिकाणी साठवले गेले पाहिजेत.किंवा बाजारात विकले गेले पाहिजेत. रस्त्यावर शेतकऱ्याला ते करणे शक्य होत नाही, पावसाळ्यात अधिक अडचण जाणवते, त्यामुळे एका गावाहून दुसऱ्या गावात जाणारे रस्ते शेतावर जाण्याचे पाय मार्ग व गाडी मार्ग व इतर ग्रामीण रस्ते या योजनेतून तयार करण्याबाबत निर्देशित करण्यात आले आहे. या योजनेमध्ये ग्रामपंचायत, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, उपविभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभाग, वनविभाग ही कार्यांना नवीन कार्यान्वयीन यंत्रणा जाहीर करण्यात आली आहे 60 टक्के अकुशल व 40 टक्के कुशल निधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे.
या योजनेमध्ये ग्रामपंचायत नेतृत्वाला वाटल्यास गावचा मोठ्या प्रमाणात विकास केला जाऊ शकतो. मातोश्री ग्रामसमृद्धी शेत योजनेअंतर्गत मागणीनुसार आराखडा तयार करण्याचे काम ग्रामपंचायतीला करायचे आहे.याशिवाय ज्या रस्त्याला अतिक्रमण आहेत त्या ठिकाणचे अतिक्रमण दूर करण्यासाठी ग्रामपंचायतला पुढाकार घ्यायचा आहे. गुंता असणाऱ्या ठिकाणी महसूल यंत्रणा अतिक्रमण मुक्त करण्यासाठी ग्रामपंचायतीला मदत करेल. यासाठी पोलिस यंत्रणा देखील मदत करणार आहे. त्यामुळे गावाच्या विकासाकडे लक्ष ठेवणाऱ्या सर्व यंत्रणांनी, समाजधुरीणांनी कल्पक सरपंचांनी, या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा यंत्रणेने केले आहे. या योजने संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी 11 नोव्हेंबर महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभाग व प्रभाग यांनी काढलेल्या शासन आदेशाचा संदर्भ घ्यावा, तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.