गणित दिनानिमित्त ५ हजार विद्यार्थ्यांनी केले सामुहिक पाढे वाचन

गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांना अनोखी श्रद्धांजली : देशात पहिल्यांदाच सामुहिक पाढे वाचन कार्यक्रम

नागपूर : थोर गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांना नागपुरातील विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली अर्पण केली. नागपूर शहरातील चिटणीस पार्क येथे एकाचवेळी सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांनी ‘बे एके बे’चे सामुहिक पाढे वाचन करीत देशभक्तीच्या संदेशासह गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांना वंदन केले. विशेष म्हणजे, नागपूर शहरात आयोजित हा अनोखा उपक्रम चर्चेचा विषय ठरलेला असून देशात पहिल्यांदाच एवढ्या व्यापक प्रमाणात सामुहिक पाढे वाचन करण्यात आले आहे.

DCIM101MEDIADJI_0646.JPG

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून महान गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीच्या अनुषंगाने राष्ट्रीय गणित दिनानिमित्त नागपूर महानगरपालिका, अग्रेसर फाउंडेशन , मनी बी इन्स्टिट्यूट व  दक्षिण-मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (ता.२२) हा उपक्रम राबविण्यात आला. महाल मधील चिटणीस पार्क येथे ‘बे एके बे’ सामुहिक पाढे वाचन कार्यक्रमात नागपूर नगरीचे महापौर दयाशंकर तिवारी, उपमहापौर मनीषा धावडे, विरोधी पक्ष नेता तानाजी वनवे, दक्षिण-मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक दीपक खिरवडकर, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने, गांधीबाग झोन सभापती श्रद्धा पाठक, शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर, अग्रेसर फाउंडेशनच्या शिवाणी दाणी वखरे व मिलींद भाकरे उपस्थित होते.

राष्ट्रीय गणित दिनानिमित्त आयोजित या उपक्रमामध्ये नागपूर शहरातील ७५ शाळांचे ५००० विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात एकस्वरात ‘बे एके बे’चे २ ते १० पर्यंतच्या पाढ्यांचे सामुहिक वाचन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पाढे वाचन करीत विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणीत केला. चिटणीस पार्कच्या मोठ्या मैदानात स्वातंत्र्याच्या ७५ वर्षपूर्ती निमित्ताने विद्यार्थी ७५ च्या आकारात बसले होते.

यावेळी बोलताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नागपूर शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञानाची गोडी लागावी, त्यांची रुची वाढावी यासाठी अग्रेसर फाउंडेशन कार्य करीत आहे. या संस्थेमार्फत पाढे वाचनाची स्पर्धा घेण्यात येते ही बाब लक्षात घेउन थोर गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीदिनी अर्थात राष्ट्रीय गणित दिवसाला पाढ्यांचे सामुहिक वाचन करण्याची संकल्पना पुढे आली. गणिताच्या रुचीसह विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचे महत्व कळावे, या मागील उद्देश असल्याचेही त्यांनी सांगितले. पुर्वी शाळांमध्ये दररोज पाढे पाठ करण्याची पद्धत होती. मात्र ती पद्धत बंद झाली. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाच्या दृष्टीने पाढे पाठांतर आवश्यक आहे त्यामुळे शाळांमध्ये पुन्हा पाढे पाठांतराची पद्धत सुरू करण्याची गरज आहे. यासाठी मनपाच्या शाळांनी पुढाकार घेउन ही पद्धत सुरू करावी, अशी सूचनाही यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी केली.

नागपूर शहराचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी नागपूर महानगरपालिका आणि अग्रेसर फाउंडेशनचे भरभरून कौतुक केले. त्यांनी सांगितले की, राष्ट्रीय गणित दिवसाला पहिल्यांदाच या प्रकारचे कार्यक्रम होत आहे. विद्यार्थ्यांचा गणिताविषयी आत्मविश्वास वाढविणारा हा अभिनंदनीय उपक्रम आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाच्या दृष्टीने उत्तम कार्यक्रम असून असे कार्यक्रम पुढे नेण्यासाठी पोलिस प्रशासनाद्वारे आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

अग्रेसरच्या प्रमुख शिवाणी दाणी वखरे यांनी प्रास्ताविकमध्ये सांगितले की, संपूर्ण शहरात ७५ शाळांमध्ये सामुहिक पाढे वाचन झाले आहेत. शहरात केशव नगर येथे भिंत रंगवण्यात आली आहे तसेच व्ही.एन.आय.टी. समोर व पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठा समोरील भिंत सुद्धा रंगविण्यात येणार आहेत. रंगविलेल्या भिंतीद्वारे प्रत्येक बालमनाला गणिताच्या जगाशी जोडण्याचा या उपक्रमाचा मानस आहे. त्यांनी या उपक्रमाला व्यापक स्वरूप देण्यासाठी महापौर दयाशंकर तिवारी यांचे आभार मानले.

७५ शाळांमध्ये इयत्ता पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी या दोन गटामध्ये स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेच्या पहिल्या इयत्ता पाचवी ते सातवी या गटात केंद्रीय विद्यालय अजनी येथील इयत्ता सातवीचा विद्यार्थी विद्यार्थी देवांश सेलोकर याला ‘मास्टर ऑफ नागपूर’ पुरस्कार देण्यात आला. द्वितीय क्रमांक गायत्री कॉन्व्हेंटचा इयत्ता सहावीचा विद्यार्थी भावेश आष्टणकर तर तिसरा क्रमांक श्री कॉन्व्हेंट मधील इयत्ता सातवीचा विद्यार्थी अथर्व काळे यांनी पटकाविले. इयत्ता आठवी ते दहावी या गटातून टिळक विद्यालयातील इयत्ता दहावीचा विद्यार्थी सुजल घोघरे ‘मास्टर ऑफ नागपूर’ ठरला. विशेष म्हणजे सुजल मुळचा गडचिरोलीचा असून तो मैत्री परिवाराच्या वसतीगृहामध्ये राहतो. या गटातून इस्टर्न कॉन्व्हेंट येथील दहावीचा विद्यार्थी ओम चौधरीने दुसरा व दयानंद विद्यालयाची इयत्ता नववीची विद्यार्थीनी साक्षी पंजाबीने तिसरा क्रमांक पटकाविला. दोन्ही गटातील सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी रक्षल ढोके, मोना भांडेकर, मंदार सुरकर, कृतिका लाखे यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन अग्रेसर फाउंडेशनचे संचालन पीयूष बोईनवार यांनी केले. आभार संकेत दुबे यांनी मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

महाकाली भक्तांच्या पवित्र स्नानासाठी मनपाने केली झरपट नदीच्या पात्राची स्वच्छता

Thu Dec 23 , 2021
चंद्रपूर : शहरातील माता देवी महाकालीच्या मंदिरात मार्गशीष महिन्यानिमित्त मराठवाडा, आंध्र प्रदेश व तेलंगणा येथून भाविकांची गर्दी होत आहे. भाविक भक्तांना नदीच्या पात्रात पवित्र स्नान करता यावे, यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून झरपट नदीच्या पात्राची स्वच्छता करण्यात आली. चंद्रपूरची महाकाली देवी विदर्भासह मराठवाडा आणि आंध्र प्रदेशात प्रसिद्ध आहे. त्यामुळे भक्तगण चंद्रपूर शहरात वर्षभर येत असतात. सध्या मार्गशीष महिन्यानिमित्त देवीच्या दर्शनासाठी मराठवाडा, तेलंगणा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com