मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर उदयोन्मुख खेळाडूंसाठी प्रेरणास्रोत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

– वानखेडे स्टेडियमवरील सचिन तेंडुलकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे दिमाखात अनावरण

मुंबई :- ‘संघर्षातून विजय कसा मिळवावा याचे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हे प्रतिक आहेत. त्यांचा पुतळा उदयोन्मुख खेळाडूंसाठी प्रेरणास्रोत ठरेल,’ असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे काढले.

विख्यात क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या पुतळ्याचे आज वानखेडे स्टेडियम येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या सोहळ्यात ते बोलत होते. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने तेंडुलकर यांचा हा २२ फूट उंच पुतळा उभारण्यात आला आहे. ढोल ताशांच्या गजरात या पुतळ्याचे दिमाखात अनावरण झाले.

या सोहळ्यास क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) उपाध्यक्ष राजीव शुक्ला, बीसीसीआयचे सचिव जय शहा, बीसीसीआयचे खजिनदार आमदार ॲड. आशिष शेलार, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे, उपाध्यक्ष संजय नाईक, सचिव अजिंक्य नाईक, सहसचिव दीपक पाटील, खजिनदार अरमान मलिक, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य आदी तसेच सचिन तेंडुलकर यांच्यासह त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आज आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला एक ‘मास्टर ब्लास्टर’ क्षण आहे. आज या मैदानावर दोन – दोन ‘मास्टर ब्लास्टर’ आहेत.एक मूर्तीमंत..आणि एक मूर्तीबद्ध. सचिन हा क्रिकेटचा देव आहे. सचिनने आपलं करिअर याच मैदानातून सुरु केले आणि याच मैदानात कारकिर्दीमधील अखेरच्या चेंडूचा सामना केला. भारत विश्वचषकाचा विजेता बनावा हे सचिनचे स्वप्न याच स्टेडियमवर पूर्ण झाले आहे. क्रिकेट विश्वात दुसरा सचिन होणे नाही. पण, मूर्तीकार प्रमोद कांबळे यांनी तो चमत्कार करून दाखवला आहे. सचिन तेंडुलकर या नावात स्फूर्ती आहे. संघर्षातून विजय कसा मिळवावा याचे सचिन प्रतिक आहेत. हा पुतळा तरुणांना आपले ध्येय गाठण्यासाठी मोठी ऊर्जा देणारा आणि क्रिकेटपटूंसाठी प्रेरणास्त्रोत ठरेल. सचिन हा भारताने जगाला बहाल केलेला चमत्कार आहे. इतर देशांकडे क्रीडा क्षेत्रातील आश्चर्य, विक्रम असतील. पण सचिन हेच एक मूर्तीमंत आश्चर्य आपल्याकडे आहे. तो महाराष्ट्राचा सुपुत्र आहे. याचाही सार्थ अभिमानही आपल्याला आहे. त्यांचा हा पुतळा वानखेडे स्टेडियमच्या वैभवात, गौरवात भर घालणारा आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सचिन यांच्या बॅटमधून येणारे चौकार, षटकार अनुभवले की आपली दिवसभराची मरगळ झटकली जाते. मन प्रसन्न होते. लता दीदींच्या स्वरांनीही आपले मन असंच प्रसन्न होतं. लता दीदींनीही सचिन यांच्या फलंदाजीवर भरभरून प्रेम केले. लता दीदींचे स्वर आणि सचिनच्या बॅटमधून निघणाऱ्या धावांचा वर्षाव या दोन्ही गोष्टी अजरामर आहेत. जगाच्या अंतापर्यंत राहणाऱ्या आहेत. जगभरातील तमाम क्रिकेट प्रेमींचे विश्व समृद्ध केल्याबद्दल सचिन तेंडुलकर यांचे आभारच मानायला हवेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मास्टर ब्लास्टर सचिन यांनी, ‘वानखेडे येथील हा पुतळा माझा बहुमान असल्याचे आणि हा बहुमान आपल्यासोबत क्रिकेटमध्ये सहकारी राहिलेल्यांना समर्पित करत असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, हा माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे. सदैव मी माझ्या देशासाठी क्रिकेट खेळलो. या मैदानाने मला खूप काही दिले आहे. इथे आल्यावर माझ्या मनात अनेक आठवणींची गर्दी उसळते. माझ्या आवडत्या मैदानावर माझा पुतळ्याच्या रुपात बहुमान होत आहे. तो मी विनम्रपणे स्वीकारत आहे. यावेळी सचिन यांनी आपल्या कारकीर्दीतील वेगवेगळ्या टप्प्यांचा उल्लेख केला. अनेक किस्से देखील सांगितले.

ज्येष्ठ नेते खासदार पवार म्हणाले की, ज्या मैदानावर खेळाच्या माध्यमातून कर्तृत्व गाजवले, त्याच ठिकाणी पुतळा उभारला जावा, असा बहुमान फार क्वचितच व्यक्त‍िमत्वांना मिळतो. या पुतळ्यामुळे नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, कारण त्यांचे पाय नेहमीच जमिनीवर राहिले आहेत. त्यांनी सन्मान डोक्यात शिरू दिला नाही.’ यावेळी श्री.पवार यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनने क्रिकेटचे संग्रहालय निर्माण करावे. त्यामध्ये सचिन तेंडुलकर यांच्या क्रिकेट कारकिर्दीविषयी स्वतंत्र दालन असावे अशी सूचना देखील केली.

बीसीसीआयचे सचिव शहा म्हणाले की, सचिन यांनी देशाच्या क्रिकेटला कुटुंबापेक्षा अधिक प्राधान्य दिले. त्यांचे क्रिकेटसाठीचे योगदान उत्तुंग असे आहे. यावेळी शहा यांनी सचिन यांच्या फलंदाजीतील धावसंख्या आणि त्यातील योगायोग यांचा आवर्जून उल्लेख केला.

यावेळी पुतळ्याचे शिल्पकार प्रमोद कांबळे यांचा सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष काळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी बीसीसीआयचे उपाध्यक्ष शुक्ला यांचे समयोचित भाषण झाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आशा स्वयंसेविकांची दिवाळी होणार गोड, मानधन वाढीसह, मिळणार दिवाळी भेटही - सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत

Thu Nov 2 , 2023
मुंबई :- राज्यात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेअंतर्गत 80 हजारांपेक्षा अधिक आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. आशा स्वयंसेविकांना 7 हजार रुपये मानधन वाढ, 3 हजार 664 गट प्रवर्तकांना प्रत्येकी 6 हजार 200 रुपये मानधन वाढ, आशा व गट प्रवर्तकांना प्रत्येकी 2 हजार रुपये दिवाळी बोनस देण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज आरोग्य भवन येथे आशा स्वयंसेविका, संघटनांचे प्रतिनिधी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com