तीन महिन्यात सर्व श्वान मालकांनी नोंदणी करण्याची सूचना
नागपूर : नागपूर महानगरपालिका क्षेत्रात श्वान पाळणा-यांना आता मनपामध्ये नोंदणी करणे बंधनकारक आहे. महापालिका हद्दीत राहणा-या सर्व श्वान मालकांना तीन महिन्याच्या आत अर्थात ९० दिवसांमध्ये नोंदणी करणे अनिवार्य आहे, अशी सूचना मनपाचे उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. गजेंद्र महल्ले यांनी केली आहे.
श्वान नोंदणीसाठी मनपाद्वारे सर्व झोन कार्यालयामध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय श्वान नोंदणीसंबंधी सविस्तर माहितीसाठी nmcnagpur.gov.in/circularfordogregistration ही लिंक जारी करण्यात आली आहे. मनपा क्षेत्रात विना नोंदणी श्वान पाळल्याचे निदर्शनास आल्यास किंवा तशी तक्रार प्राप्त झाल्यास मनपाद्वारे श्वान मालकावर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील सर्व श्वान मालकांनी आपल्या संबंधित झोन कार्यालयात जाउन नोंदणी करून घ्यावी, असे आवाहनही डॉ. महल्ले यांनी केले आहे.