संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यात एकूण 47 ग्रामपंचायती असून या ग्रामपंचायतीच्या माहिती दस्ताऐवजामध्ये आहे. मात्र यापूढे सर्व माहिती महा-ई-ग्राम पोर्टल मध्ये ग्रामसेवकाना अचूक भरावा लागणार आहे .मालमत्ता कराचा भरणा पोर्टलवरून होऊन त्या कराची रक्कम थेट जिल्हास्तरावरील खात्यात जमा होऊन 24 तासानंतर ती ग्रामपंचायतीच्या खात्यात येणार आहे.भरणा केल्यानंतर मालमत्ता धारकाला ऑनलाइन पक्की माहिती मिळणार आहे त्यामुळे ग्रामपंचायतीची बोगस वसुली हेराफेरीला चाप बसणार आहे.
शासनाने ग्रामपंचायतीत पेपरलेस संकल्पना सुरू केली असून काही महिन्यापूर्वीच नागरिकांना विविध दाखले थेट घरीच मिळावे यासाठी महा इ ग्राम सिटीझन कनेकट मोबाईल ऐप विकसित केले आहे.त्याच्या माध्यमातून दाखल्याच्या सुविधा व करभरण्याच्या सुविधा पुरविल्या आहेत.आता एक पाऊल पुढे म्हणून ग्रामपंचायतीचा कारभार हायटेक करत ग्रामपंचायतीचे प्रशासकीय कामकाज देखील महा ई ग्राम पोर्टल वरून केल्या जाणार आहे.पोर्टल वर प्रत्येक ग्रामपंचायती व गावाच्या मालमत्ताची कुंडली एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.
या पोर्टलवर गावाचा लेखाजोखा,गावातील मालमत्ता,विविध योजनांचे लाभार्थी,ग्रामपंचायतीचे 1 ते 33 नमुने, दिव्यांग महिला, वंचित घटक ग्रामपंचायतीचे उतारे यासह मालमत्ता धारकाचा डाटा ,ग्रामपंचायतिच्या मालकीच्या मालमत्ताची माहिती ग्रामसेवकाना या पोर्टलमध्ये भरावी लागणार आहे. कागदोपत्री मालमत्ता कराच्या वसुलीत पारदर्शीपणा येणार. ग्रामीण भागात ग्रामपंचायती कडून पाणीपट्टी,घरपट्टी,अशा मालमत्ता करांचा भरणा देखील याच पोर्टलवर करावा लागणार आहे.त्यासाठी गावातील मालमत्ताच्या नोंदी नावानुसार पोर्टलवर फीड करण्याचे आदेश समस्त ग्रामसेवकाना देण्यात आले आहे.त्यामुळे प्रत्यक्षात कमी होत असलेली मात्र दरवर्षी कागदोपत्री 70 ते 80 टक्के दाखवली जाणाऱ्या मालमत्ता कराच्या वसुलीत पारदर्शकता येणार आहे.त्यामुळे मालमत्ता कराच्या वसुलीचे खोट्या आकडेवारीला चाप बसणार आहे.